Sun, Aug 18, 2019 14:26होमपेज › Pune › उत्पन्न स्त्रोत दारातच; तरीही एसटीचे दुर्लक्ष!

उत्पन्न स्त्रोत दारातच; तरीही एसटीचे दुर्लक्ष!

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 1:10AMपुणे : निमिष गोखले 

उत्पन्नाचे सर्व स्त्रोत दारातच असूनही तोट्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत आहे.  सातत्याने होणार्‍या डिझेल दरवाढीमुळे अखेर एसटीला 18 टक्के तिकीट दरवाढ करावी लागली. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला  कात्री लागली.

रेल्वेप्रमाणे तोटा कमी करण्यासाठी एसटी प्रशासनानेही विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. एसटीला एक किलोमीटरमागे एक रुपया मिळत असून, राज्यभरात दररोज एसटी सुमारे 60 लाख किलोमीटर अंतर धावते. त्यामुळे एसटी महामंडळाला दररोज 57 लाखांचे नुकसान होते. तसेच राज्यातील 250 आगारांत कार्यरत असलेल्या एक लाख कर्मचार्‍यांच्या वेतन आणि भत्त्यांवर 3 हजार कोटी वार्षिक खर्च होत आहे. म्हणूनच हे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रवासी वाहतुकीसोबतच बसच्या सहाय्याने मालवाहतूक करण्याचा परिवहन विभागाचा विचार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मागील वर्षी केली होती. परंतु अद्यापही हा निर्णय कागदोपत्रीच आहे.  दरवर्षी एसटीच्या जवळपास 1500 गाड्या नादुरुस्त असल्याने भंगारात काढाव्या लागतात. या गाड्यांची रचना बदलून त्या माल वाहतुकीला वापरणे सहज शक्य होऊ शकते, असेही एसटीतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. माल वाहतुकीची महत्त्वाकांक्षी सेवा सार्वजनिक-खासगी भागीदारीत (पीपीपी) चालविली जाणारी योजना अंमलात आल्यास एसटी तोट्यातून निश्‍चितच बाहेर पडेल, असे जाणकार सांगतात. 

राज्यभरात एसटीने सुमारे 70 लाख तर  पुणे विभागातून दररोज 3 लाख प्रवासी विविध ठिकाणी प्रवास करतात. बहुतांश वेळा एसटी स्थानकावर नातेवाईक, कुटुंबिय, मित्र मंडळी यांना सोडायला लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात. अशा वेळी स्थानकावर पाऊल ठेवायलाही  जागा नसते. जर एसटी रेेल्वेप्रमाणे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट हा उपक्रम सुरू केला, तर राज्यभरात एसटीला दररोज सुमारे 20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्म तिकीट न काढणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केल्याने  महसुलात वाढच होणार आहे. 

रेल्वेच्या पुणे विभागाने ज्या प्रमाणे पुणे स्टेशनवर पाच रुपयात अर्धा लिटर शुद्ध पाणी देण्याचा उपक्रम, वॉटर व्हेंडिंग मशिन लावून सुरू केला आहे, तसाच एसटीने सुरू केल्यास, ते देखील उत्पन्नाचे एक चांगले साधन ठरू शकेल. कंत्राटदाराला वॉटर व्हेंडिंगसाठी जागा देऊन, त्यातून भाडे मिळवले जाऊ शकते. एसटीने या पर्यायांचा विचार केल्यास एसटी एके दिवशी निश्‍चितच फायद्यात येईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

वायफळ खर्चच अधिक

ज्या मार्गांवर एसटीची वारंवारिता चांगली आहे व ज्या मार्गावर प्रवासी अधिक नाहीत, असे मार्ग शोधून काढून ते बंद करण्यात यावेत. नादुरुस्त एसटी सेवेतून बाद करण्यात याव्यात. ग्रामीण भागात धावणार्‍या बहुतांश एसटी धक्का स्टार्ट असून, बस थांबल्यावर त्या बंद करता येत नाहीत. यामुळे विनाकारण डिझेल जळून एसटीच्या कोट्यवधी रुपयांचा अक्षरशः चुराडा होतो. या एसटी दुरुस्त केल्या तरी हजारो लिटर डिझेल वाचू शकेल.

पुण्याच्या ग्रामीण भागात मालवाहतूक होतीये पण...

एसटीतून पूर्णतः मालवाहतूक होत नसली तरीदेखील ग्रामीण भागातून प्रवाशांसह अन्नधान्याची पोती आणली जात आहेत. ज्वारी, बाजरी, गव्हाची पोती डिकीत घालून, टपावर ठेवून आणली जात असून, ज्यांना जीप, रिक्षा परवडत नाही, अशांची मोठी सोय होते. 6 किलोमीटरला 1 रुपया व 40 किलोंपर्यंत प्रत्येकी एक पोते घेऊन जाण्यास परवानगी असून, त्यासाठी आकारण्यात येणार्‍या माफक दरामुळे प्रवाशांना फायदा होतो. परंतु रेल्वेच्या मालगाडीप्रमाणे संपूर्ण एसटीच मालवाहतुकीसाठी वापरणे अद्यापही सुरू झालेले नाही. ते सुरू झाल्यास उत्पन्न वाढू शकते.