Sun, Mar 24, 2019 08:17होमपेज › Pune › लवकरच मोफत गुडघा आणि खुबा प्रत्यारोपण

लवकरच मोफत गुडघा आणि खुबा प्रत्यारोपण

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:14AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील रुग्णांमध्ये गुडघादुखी आणि खुबा (हिप) यांचा त्रास पाहता राज्य शासनाने गुडघा प्रत्यारोपण आणि हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत करण्याचा उपक्रम राबविण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर येत्या काळात दहा लाख शस्त्रक्रिया मोफत होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अस्थिशल्यचिकित्सक डॉक्टरांची बैठक बोलावली होती. तसेच या उपक्रमाची धुरा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे दिली आहे.

खेड्यापाड्यात सध्या अनेकांना गुडघादुखीचा त्रास होत आहे. ‘हिप’चाही  म्हणजेच खुब्याचा त्रास होत असल्यामुळे अनेक रुग्णांना शासकीय (टर्शरी केअर) रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागते. त्यावरून राज्य शासनाने हा महत्त्वाचा आजार असल्यामुळे हे पाऊल उचलले आहे. आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 40 वयोगटाच्या पुढील चार कोटी नागरिक आहेत. त्यापैकी 40 लाख लोकांना सांधेदुखीचा त्रास असल्याचा अंदाज आहे. यापैकी 10 लाख जणांना गुडघा प्रत्यारोपण आणि हिप रिप्लेसमेंटची आवश्यकता असल्याचे अनुमान काढण्यात आलेले आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. या प्रत्यारोपण कार्यक्रमाच्या जागृतीसाठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी, ट्रस्ट, सामाजिक संस्था यांची मदत घेऊन मोहीम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि या उपक्रमाचे प्रमुख डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.

खासगी रुग्णालयांनी मांडला बाजार

गुडघा प्रत्यारोपण आणि खुबा प्रत्यारोपण करण्यासाठी सध्या खासगी रुग्णालयांमध्ये तीन ते पाच लाख रुपये इतका प्रचंड खर्च येतो आहे. काही रुग्णालयांनी याचा बाजारच मांडला आहे. हा त्रास असणारे बहुतांश रुग्ण हे गरीब आहेत. त्यांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे त्यांचा हा सर्व खर्च मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान सहायता निधीतून करण्यात येणार आहे. या रुग्णांवर शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय रुग्णालये येथे उपचार करण्यात येतील. यासाठी रुग्णांची माहिती ग्रामीण भागातील अस्थिरोग तज्ज्ञांकडून (आर्थोपेडिक) गोळा केली जाणार आहे.