Tue, May 21, 2019 12:19होमपेज › Pune › तुकाराम मुंढे यांच्या कार्यकालात काही अधिकार्‍यांचा चकवा

तुकाराम मुंढे यांच्या कार्यकालात काही अधिकार्‍यांचा चकवा

Published On: Mar 14 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 12:42AMपुणे : प्रतिनिधी 

‘पीएमपीएमएल’चे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडून होणार्‍या असल्याची बाब उघडकीस आली असून, आता हेच अधिकारी मुंढे यांची बदली झाल्यानंतर कामावर पुन्हा रुजू होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

‘पीएमपीएमएल’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी झाडाझडतीस सुरुवात केली होती. बेशिस्तपणा करणारे अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कारवाईचा धडाका लावला होता. बडतर्फी, निलंबन, दंडात्मक कारवाई यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले होते. तसेच ठराविक अंतराने बहुतांशी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चौकशीसुद्धा केली होती. या कारवाईचा धसका घेऊन काही अधिकार्‍यांनी आजारी असल्याचे कारण पुढे करून घरी थांबणेच पसंत केले होते. कामावर पुन्हा रुजू झाल्यानंतर संबंधितांची चौकशी केली जाते; त्याचप्रमाणे अनेकदा आजारी असल्यामुळे अनेक वेळा चौकशीचा ससेमिरासुद्धा टाळता येतो. याच बाबींचा लाभ काही अधिकारी; तसेच कर्मचार्‍यांनी मुंढे यांच्या कार्यकाळात घेतला आणि कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी आजारी असल्याचे ‘नाटक’ केले होते, अशी चर्चा  ‘पीएमपीएमएल’ वर्तुळात सुरू आहे. आता मात्र तत्कालीन अध्यक्ष मुंढे यांची बदली झाली आणि संबंधितांचा ‘आजार’सुद्धा लागलीच पळाला आहे. आजारपणाचे ‘नाटक’ केलेले काही जण तीन-चार दिवसांपूर्वी कामावर रुजू झाले असल्याचे दिसून आले आहे. 

यामध्ये काही वरिष्ठ अधिकार्‍यांचाही समावेश आहे. या अधिकार्‍यांची मुंढे यांच्या कार्यकाळात चौकशी सुरू करण्यात येणार होती; मात्र त्यापूर्वीच या संबंधित अधिकार्‍यांनी; तसेच कर्मचार्‍यांनी आजारी असल्याचे कारण देऊन रजा घेतली होती. ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाकडून चौकशीसाठी सातत्याने बोलावण्यात आले; मात्र प्रत्येकवेळी वैद्यकीय रजेचे कारण देण्यात आले; त्यामुळे काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चौकशीच झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. कामावर पुन्हा रुजू होणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबाबत ‘पीएमपीएमएल’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे काय भूमिका घेणार, याबाबत ‘पीएमपीएमएल’च्या वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे..