Tue, Jul 23, 2019 02:04होमपेज › Pune › 56 वर्षांची तरुणी करणार सोलो सायकल प्रवास

56 वर्षांची तरुणी करणार सोलो सायकल प्रवास

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 12:08AMपुणे : प्रतिनिधी

विविध क्षेत्रात विक्रम करणार्‍या पुण्यातील पुरुषांबरोबरच महिलाही आता आघाडी घेऊ लागल्या आहेत. पुण्यातील एसएनडीटी वाणिज्य महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या वासंती जोशी, या कन्याकुमारी ते लेह असा तब्बल 4275 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 40 दिवसांत पूर्ण करणार आहेत. वीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने दि. 28 मे रोजी या मोहिमेला सुरुवात करणार असून, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दि. 5 जुलै रोजी श्रध्दांजली अर्पण करून, त्या मोहिमेची सांगता करणार आहेत. कन्याकुमारीहून त्या आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. लेहमधील 19,300 फुटावरील उमलिंग खिंडीपर्यंत जाण्याचे जोशी यांचे स्वप्न आहे. शताब्दी पूर्ण केलेल्या या विद्यापीठाचा झेंडा, आधुनिक युगातील स्त्री सशक्‍तीकरणाचे प्रतिक म्हणून उमलिंग खिंडीत फडकाविण्यात येणार आहे. भीतीवर मात करून, वय आणि लिंग यांच्या सीमा पार करून चमत्कार घडवता येतो, याचे उदाहरण नेहमी कृतीमधून महिलांपुढे ठेवणे हे आपले ध्येय असल्याचे वासंती जोशी सांगतात. 

वासंती जोशी त्यांच्या मार्गदर्शक आणि यशस्वी उद्योजिका शुभदा जोशी आणि उगवती उद्योजिका कन्या केतकी जोशी, या संपूर्ण प्रवासात त्यांच्याबरोबर राहून त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य करणार आहेत. डॉ. जयंत जोशी आणि विश्‍वास जोशी या मोहिमेचे संयोजक आहेत. मोहिमेदरम्यान निरीक्षण आणि रॅण्डम सॅम्पल सर्व्हे पध्दतीचा वापर करून, महिलांसंदर्भातील काही निवडक मुद्द्यांविषयी प्राथमिक स्वरुपाची माहिती गोळा करण्याचेही त्यांचे उद्दिष्ट आहे. यात भीतीवर मात करण्याच्या मुद्द्यावर अधिक भर असल्याचेही वासंती जोशी यांनी यावेळी सांगितले.