Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Pune › मला सेवा मुक्‍त करा : जवान चंदू चव्‍हाण

मला सेवा मुक्‍त करा : जवान चंदू चव्‍हाण

Published On: May 21 2018 10:56AM | Last Updated: May 21 2018 10:56AMपुणे : पुढारी ऑनलाईन

भारताची सीमा ओलांडून चुकून पाकिस्‍तानमध्ये गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांनी भारतीय सैन्य दलातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहले आहे. पाकिस्तानच्या सीमेवर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना भारतीय सैन्यातील ३७ नॅशनल रायफलचे जवान चंदू चव्हाण चुकून पाकिस्तान हद्दीत गेले होते. त्यामुळे चंदूला पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. तब्बल ११४ दिवसानंतर पाकिस्‍तानकडून त्‍यांची सुटका करण्यात आली.  

चंदू चव्हाणवर सध्या खडकी येथील मिलिटरी हॉस्‍पीटलध्ये मानसोपचार तज्ञांकडून उपचार सुरु आहेत. त्‍यांनी हॉस्‍पीटलमधूनच वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे. 

पाकिस्‍तानमधून परतल्‍यानंतर चंदूला न्‍यायालयीन चौकशीला सामोरे जावे लागले होते. त्‍यानंतर न्‍यायालयाने सुनावलेली शिक्षाही त्‍याला भोगावी लागली. शिक्षा भोगल्‍यानंतर चंदू चव्हाणला अहमदनगर येथील कॉर्पस सेंटरमध्ये पाठविण्यात आले होते. त्‍याठिकाणाहून तीन आठवड्यापूर्वी त्‍याला उपचारासाठी खडकी येथील मिलिटरी हॉस्‍पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हॉस्‍पीटलमधून चंदूने भारतीय सैन्यातून सेवामुक्‍ती देण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. 

चंचू म्‍हणाला की, ‘‘गेल्‍या २० दिवसांपासून उपचारासाठी मी मिलिटरी हॉस्‍पीटलच्या मानसोपचार वार्डमध्ये आहे. तीन दिवसांपूर्वी मी माझ्या वरिष्‍ठांना पत्र लिहून मला सेवा मुक्‍त करण्याची विनंती केली आहे. गेल्‍या काही दिवसांत माझ्यासोबत जे काही घडले आहे त्‍यामुळे मला नोकरी करणे कठिण जात आहे.’’ याबरोबरच नोकरी सोडल्‍यानंतर सामान्य जीवन जगण्याची इच्छाही चंदूने बोलून दाखवली आहे. 

दरम्‍यान, चंदूच्या या पत्राबाबत भारतीय लष्‍कराने अद्याप दुजोरा दिला नाही. 

Tags : Soldier, chandu chavan, Indian Army