Thu, Apr 25, 2019 05:47होमपेज › Pune › स्मार्ट सिटीत चार इमारतींवर सौरऊर्जा 

स्मार्ट सिटीत चार इमारतींवर सौरऊर्जा 

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:38AMपिंपरी : मिलिंद कांबळे 

स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील चार इमारतींवर सौरऊर्चा पॅनेल बसवून तब्बल 1.1 मेगा वॅट  वीजनिर्मिती केली जाणार आहे. परिणामी, पालिकेस 3 रुपये 65 पैसे प्रति युनिट या अल्पदराने वीज मिळून आर्थिक बचत होणार आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची 30 एप्रिलला झालेल्या बैठकीत या ‘रूफ टॉप सोलर पॉवर’  (सौरऊर्जेची निर्मिती) ‘आरईएससीओ’ मॉडेल पद्धतीने राबविण्यास मंजुरी देण्यात आली. या योजनेतून दररोज 1.1 मेगा वॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. ही योजना 30 जूनअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. 

या योजनेअंतर्गत संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय व आचार्य अत्रे रंगमंदिर, नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृह, सेक्टर 23, निगडी येथील जल शुद्धीकरण केंद्र याची निवड केली आहे. या संदर्भात नुकताच सर्व्ह पुर्ण करण्यात आला आहे. सदर इमारत व जागेवर दररोज अनुक्रमे 250, 25, 45 व 800 किलो वॅट वीज निर्मिती होणार आहे. जल शुद्धीकरण केंद्राची जागा मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे सर्वाधिक 800 किलो वॅट वीज निर्मिती होईल. 

केंद्र शासनाचे सौर ऊर्जातून वीज निर्माण करणार्या मान्यताप्राप्त कंपन्यांची पॅनेल तयार केले आहे. त्यात महाराष्ट्र राज्यातील 5 मान्यताप्राप्त कंपन्या आहेत. त्यापैकी एका कंपनीकडून ‘पीपीए’ (पॉवर परर्चेस अ‍ॅग्रीमेट) तत्वावर हे पॅनेल बसवून घेण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी लिमिटेड व कंपनीमध्ये 5 वर्षांचा करार होणार असून, पॅनेल खरेदी करणे, बसविणे, त्याची देखभाल व दुरुस्ती सदर कंपनीची जबाबदारी राहणार आहे. पालिका केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे. तयार झालेली वीज पालिका 3 रूपये 65 पैसे दराने विकत घेणार आहे. त्यामुळे महावितरणकडून घेण्यात येणारी महागड्या दराने वीजपुरवठ्याचे प्रमाण घटणार आहे. परिणामी, पालिकेची महिन्याला लाखो रूपयांची बचत होणार आहे.   

या संदर्भातील सर्व्हे पूर्ण झाला असून, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर सदर योजनेचे सादरीकरणही करण्यात आले आहेत. पाचपैकी योग्य कंपनीसोबत करार केल्यानंतर ही योजना मार्गी लागणार आहे. अद्ययावत पॅनेल उभारून अधिकाधिक वीज निर्मितीस अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. ही कार्यवाही तात्काळ पूर्ण करून 30 जूनपूर्वी सौर ऊर्जा पॅनेल बसविण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्या दृष्टीने प्रशासन काम करीत आहे.

गरज पडल्यास पालिकेचे कार्यालय व शाळा इमारतीवर सौर ऊर्जा पॅनेल बसविण्याचे नियोजन आहे. सदर वीज पालिका कार्यालर, पदपथ दिवे, उद्यान आदी ठिकाणी वापरली जाणार आहे. साप्ताहिक व इतर सुटीच्या दिवशी कार्यालय बंद असताना निर्माण होणारी वीज महावितरणाला दिली जाणार आहे. ती वीज बिलातून वजा केली जाईल. त्याचाही फायदा पालिकेस होणार आहे.  दरम्यान, जिल्हा नियोजन व  विकास समितीकडून सौर ऊर्जा पॅनेल बसविण्यासाठी 2 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. त्यातून आणखी 50 किलो वॅट वीज निर्मितीसाठी पालिका भवनावर पॅनेल बसविण्यात येणार आहेत.