Tue, Aug 20, 2019 05:14होमपेज › Pune › कायद्यात दुरुस्ती न करता सोलापूर विद्यापीठाच्या नावाची घोषणा : गणपतराव देशमुख 

कायद्यात दुरुस्ती न करता सोलापूर विद्यापीठाच्या नावाची घोषणा : गणपतराव देशमुख 

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 12:51AMपुणे : प्रतिनिधी

आज धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. मात्र एका गोष्टीची खंत वाटते, कारण नसताना मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ नेत्याने कायद्यात दुरुस्ती न करता सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. यावर जास्त टिप्पणी करणार नाही; मात्र, धनगर समाजाची फसवणूक करतात की काय अशी शंका येत असल्याची खंत ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केली. 

पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जंयतीनिमित्त पुण्यात शनिवारवाडा येथे रविवारी (दि.27) धनगर माझा सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आमदार रामराव वडकूते, अ‍ॅड. रामहरी रूपनवर, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, गोपीचंद पडळकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उत्तम जाणकार उपस्थित होते. यावेळी आमदार गणपतराव देशमुख यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना देशमुख म्हणाले, सन्माने मी भारावून गेलो आहे, हा पुरस्कार माझ्यासाठी नसून गेल्या 50 वर्षांपासून ज्या मतदाराने, कार्यकर्ते , दुष्काळी भागातील जनतेने आशीर्वाद दिले त्यांचा हा सत्कार आहे. 

प्रास्ताविक धनंजय ताणले यांनी केले. समाज भूषण पुरस्काराने पांडुरंग पोले, संगीता धायगुडे, रमेश लबडे,  ज्ञानदेव पडळकर, अनिल राऊत, मारुती येडगे यांना सन्मानित करण्यात आले. 

उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी 

राज्यातील दुष्काळ हटवला पाहिजे. बागायती क्षेत्र वाढल्याशिवाय दुष्काळ हटणार नाही. मला नेहमीच राज्याच्या दुष्काळचा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून बळ मिळत आले आहे. माझे उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी आणि धनगर आरक्षण मिळण्याच्या प्रश्नासाठी आहे. यासाठी जेे काही करावे लागेल ते उरलेल्या आयुष्यात करेल, असे आमदार गणपतराव देशमुख म्हणाले.