Thu, Jun 27, 2019 15:51होमपेज › Pune › ‘वेबसिरीज’मधून तरुणाई जपतेय सामाजिक जाणीव

‘वेबसिरीज’मधून तरुणाई जपतेय सामाजिक जाणीव

Published On: Jun 09 2018 1:51AM | Last Updated: Jun 09 2018 1:43AMपुणे ः नरेंद्र साठे

साधा हँडी कॅम... अँगलची जुजबी माहिती... फक्त समाजासमोर हा प्रश्‍न मांडायचा, ही खुणगाठ मनाशी बांधून समाजात दिसणार्‍या प्रश्‍नांवर भाष्य करण्यासाठी हे तरुण गावोगाव जाऊन दौरा करतात... जे दिसते त्यावर कष्टकर्‍यांची मते जाणून घेतात... ते शूट करून यूट्यूबवरून प्रसारित करतात. त्यांच्या या प्रयत्नाला जगभरातून ‘फॉलो’ केले जाते हे विशेष. वेबसिरीजच्या माध्यमातून हे करून दाखवले आहे प्रवीण राठोड आणि त्याच्या टीमने. 

स्मार्ट फोनमुळे तरुणाईच्या विश्वात क्रांती आणली. मोबाईलचा वापर वाढल्याने सहाजिकच टेलिव्हीजन पाहण्यावर परिणाम झाला. त्याचबरोबर मोबाईल कंपन्यांनी इंटरनेटमध्ये सवलती दिल्या. थ्री जी, फोर जी इंटरनेट स्पीड असलेले सर्वांच्या हातात स्मार्ट फोन आले. तुम्ही कुठेही असा, मोबाईलमधील एका क्लिकवर तुम्हाला यूट्यूबवर हवी ती सिरीज पाहता येणे सोपे झाले. 

सामाजिक जाणीव असलेले विषय काही तरुणांनी हाताळले, तर काही दिवसांपूर्वी बार्शीच्या सहा-सात तरुणांनी एकत्र येऊन खास रे टीव्हीच्या माध्यमातून डबिंग केलेली वेबसिरीज केली. या मनोरंजनाच्या वेबसिरीजची तरुणांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली होती.ज्या प्रमाणात मनोरंजनात्मक वेबसिरीज येतात. त्याचप्रमाणे अतिशय गंभीर विषय असणार्‍या वेबसिरीजदेखील तरुणाई तयार करीत आहे. ऊस तोड कामगार, शाळकरी मुलांचे शाळा बंद नंतरचे होणारे हाल, स्पर्धा परीक्षेसाठी कष्ट करणारी मुले, अशा प्रकारची समाजातील विविध विषय ‘डिकोड इंडिया’ या वेबसिरीजच्या माध्यमातून पुण्यातील काही तरुण मांडत आहेत. सध्या यूट्यूबवर ‘गावकडच्या गोष्टी’ ही वेबसिरीज एक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गावकडच्या गोष्टीमध्ये अभिनय क्षेत्रातील व्यक्ती आहेत, मात्र सर्व शूटिंग गावामध्येच केले जात असल्याने आणि शहरी तरुणांना गावगाडा पाहण्यास मिळत असल्याने ही सिरीज चांगलीच गाजली आहे. सध्याची तरुणाई स्मार्ट फोन एके स्मार्ट फोन असा जप करत असते. 

सातार्‍यातील गावामध्येच सगळं शूटिंग करतो. मनोरंजनासोबतच, काही तरी संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असतो. गावामध्येच शूट होत असल्याने गावगाडा सर्वांसमोर मांडता येत आहे. अल्पावधीतच यूट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आमच्या टीममध्ये समाधान आहे. -रश्मी साळवी, अभिनेत्री

आम्ही सर्व मित्र बारावी झाल्यानंतर वेगवेगळ्या फिल्डमध्ये गेलो. पण कुणालाच त्यात रस नसल्याने वेबसिरीज करण्याचे ठरवले. त्यानुसार वेबसिरीज करण्यास सुरुवात केली. यूट्यूबरवर मिळणार्‍या
प्रतिसादामुळे चित्रपटाच्या प्रमोशनची कामे आम्हाला मिळू लागली, तर काहींना अभिनयाची कामेदेखील मिळू लागली आहेत. - प्रणय रावळ, ‘खास रे’ सिरीज सदस्य

वेबसिरीजच्या माध्यमातून खेड्यापाड्यातला कलावंत आपल्या कलेला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोचवतोय ही कौतुकास्पद बाब आहे. तरुणाई आपल्या भावना या माध्यमातून व्यक्त करत असल्याने, त्याला सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळतोय. मराठी वेबसिरीजबाबत बोलायचं झालं, तर दर्जा आणि गुणात्मकदृष्ट्या अजून मेहनत घ्यायला हवी, असे मला वाटते. - अनिकेत बोंद्रे, लेखक- दिग्दर्शक