Fri, Mar 22, 2019 01:27
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › भाजपाची ‘चाणक्य’ नीती, ‘सोशलवारी’ सुपरफास्ट

भाजपाची ‘चाणक्य’ नीती, ‘सोशलवारी’ सुपरफास्ट

Published On: Jul 10 2018 1:29AM | Last Updated: Jul 10 2018 1:09AMपुणे ः  दिगंबर दराडे

सर्व पक्षांना गाफिल ठेवत भाजपने सोशल मीडियावरील अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या तरुणांना हेरून संधी साधली आहे. पक्षाचे चाणक्य अर्थात अमित शहा यांनीच बौद्धिक दिल्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची ‘सोशलवारी’ सुपरफास्ट निघल्याचे सूचित करून इतर पक्षांसमोर ‘सोशल आव्हान’ उभे केलेे.   

निवडणुकीचा चेहरा सोशल मीडियाने बदलून टाकला. फेसबुक, ट्विटर आणि गुगल या साइट्सचा राजकीय पक्षांनी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी देशात आणि राज्यात होणार्‍या निवडणुकांची तयारी म्हणून भाजप चांगलाच कामाला लागला आहे. पुण्यात बालगंधर्वमध्ये घेतलेल्या सोशल मीडियाच्या कार्यक्रमाला तरुणांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने  वास्तव समोर आले आहे. या सोशलवारीत इंजिनिअर, वकील, डॉक्टर असलेले तरुण पुढाकार घेत आहेत. सोशल युद्धासाठी तयारी करण्याच्या सूचना पक्षाध्यक्षांनी दिल्याने तरुणांमध्ये उत्साह वाढला आहे.   

ग्रामीण भागापर्यंत सोशल मीडिया पोहोचू लागला. आतापर्यंत सोशल मीडियाचा वापर राष्ट्रीय पक्षच करत होते. मात्र आता प्रादेशिक पक्षही सोशल मीडियाचा वापर करू लागले आहेत. ट्विटर आता भारतीय निवडणुकांचे अविभाज्य घटक बनले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांचे राजकीय वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाने मतांची रास आपल्याकडे ओढण्यासाठी विविध फंडे, फॉर्म्युले शोधण्यास सुरुवात केली आहे. संसदीय निवडणुकांच्या राजकारणासाठी लागणारी लोकशाही आयुधे पक्षांनी पेरायला सुरुवात केली. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचे प्रस्थ वाढू लागले आहे.

सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतात सुमारे 90 कोटी मोबाईलधारक आहेत. इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या साडेतेरा कोटींच्या घरात आहे. त्यात 99 टक्के शहरी मंडळी आहेत. खासकरून देशातील तरुणाईत मोबाईल, इंटरनेट म्हणजेच सोशल मीडिया वापरण्याची जबरदस्त क्रेझ आहे. स्टेटस सिंबॉल म्हणून तरुणाई त्याकडे बघते. याचाच फायदा घेण्याची रणनीती भारतीय जनता पार्टीने आखली आहे.