Thu, Jun 27, 2019 17:46होमपेज › Pune › स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ उतरणार बारामतीच्या मैदानात

स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ उतरणार बारामतीच्या मैदानात

Published On: Apr 16 2019 2:20AM | Last Updated: Apr 16 2019 1:30AM
बारामती : प्रतिनिधी

बारामती लोकसभा मतदारसंघ पुरता ढवळून काढण्याची रणनीती महायुतीने आखली आहे. 21 एप्रिलला प्रचाराची सांगता होणाच्या दिवशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची 19 एप्रिलला बारामतीत सभा होत आहे. त्या पाठोपाठ 21 एप्रिलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेची परवानगी बारामती भाजपने पोलिसांकडून काढली आहे; परंतु बारामती शहरात लागोपाठ दोन मोठ्या सभा घेण्याऐवजी गडकरींची सभा अन्य विधानसभा क्षेत्रात घेतली तर फायद्याचे ठरेल, असे गणित मांडले जात आहे. त्यामुळे गडकरींच्या सभेची अद्याप निश्चिती झालेली नाही.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 21 तारखेला हिंजवडी व परिसरात सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे. सभा झाली नाही तर किमान रोड शो व्हावा, असे नियोजन केले जात आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ना. पंकजा मुंडे यांची बारामती एमआयडीसी व इंदापूर तालुक्यात सभा होणार आहे. ना. गिरीश महाजन हे बारामती तालुक्यातील माळेगाव व सांगवी येथे सभा घेणार आहेत. याशिवाय ना. राम शिंदे, ना. महादेव जानकर यांच्या सभांची ठिकाणे महायुतीकडून निश्‍चित केली जात आहेत.

अजित पवार बुधवारी बारामती दौर्‍यावर

पार्थ पवार यांच्या प्रचारात मावळमध्ये अडकून पडलेले आ. अजित पवार हे बारामती तालुक्यावरही लक्ष ठेवून आहेत. गत आठवड्यात दोनदा त्यांनी बारामतीला भेट दिली आहे. कन्हेरी (ता. बारामती) येथे महाआघाडीच्या उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात त्यांनी केली. त्यानंतर शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांच्या भेटी घेत त्यांना सक्रिय केले. गत जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात बंड करत शड्डू ठोकलेल्या सोमेश्वरचे संचालक सुनील भगत, वडगाव निंबाळकरचे माजी सरपंच सुनील ढोले यांचीही भेट पवार यांनी घेतली. या नाराज मंडळींना प्रचारात सक्रिय होण्याचे आवाहन केले. आता बुधवारी पवार हे बारामती तालुक्यात निरा-वागज, सांगवी, माळेगाव बुद्रुक, वडगाव निंबाळकर, सोमेश्वरनगर व सुपे अशा सहा सभा घेणार आहेत.