Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Pune › ‘आयटी’तील महिलांमधील धूम्रपानाने बाळांना दम्याचा धोका

‘आयटी’तील महिलांमधील धूम्रपानाने बाळांना दम्याचा धोका

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:13AMपुणे :  ज्ञानेश्‍वर भोंडे

हल्‍ली महिलांमधील धूम्रपान वाढल्याने त्याचा परिणाम त्यांच्या होणार्‍या बाळांना सहन करावा लागत आहे. धूम्रपानामुळे तब्बल 40 ते 80 टक्के बालकांना दमा होण्याचा धोका वाढला आहे म्हणून महिलांनी गर्भावस्थेत तरी धूम्रपान करू नये; तसेच धूम्रपान करणार्‍यांच्या संपर्कात येऊ नये असे आवाहन तज्ज्ञ करीत आहेत. दरवर्षी एक मे हा दिवस ‘जागतिक दमा दिन’ म्हणून पाळला जातो. त्या पार्श्‍वभूमीवर हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. नव्वदच्या दशकानंतर महिलांमधील शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने त्यांचे नोकरी करण्याचे प्रमाण वाढले. त्यातच पुणे आयटी हब म्हणून पुढे आले आहे. हिंजवडी, बाणेर, नगर रोड, विमाननगर येथे मोठ मोठया आयटी कंपन्या कार्यरत असल्याने येथे हजारो तरुण महिला, पुरुषांच्या बरोबरीनेच काम करतात. या क्षेत्रांत काम करणार्‍या वर्गामध्ये कधी स्टेटस म्हणून, तर कधी कामाचा ताण घालविण्यासाठी बर्‍यापैकी  धुम्रपानाचे व्यसन दिसून येते. म्हणून सर्वात जास्त धोका येथे काम करणार्‍या महिलांना आणि त्यांच्या होणार्‍या बाळांना असल्याचे समोर आले आहे. 

अमेरिकेत विल्सन आणि सहकारी यांनी वीस ते पंचवीस वर्षापूर्वी यासंदर्भात अभ्यास केला असता हे निष्कर्ष समोर आले होते. त्यावेळची अमेरिकेतील परिस्थिती सध्या आपल्याकडे असून, विशेषतः आयटीतील महिला जास्त प्रमाणात धुम्रपान करतात. त्यामुळे त्यांच्या बाळांना दमा होण्याचा धोका 40 ते 80 टक्के आहे, अशी माहिती ससूनमधील निवासी छातीरोगतज्ज्ञ व बीजे पुणे ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. दत्‍ता शेटे यांनी दिली.  

तज्ज्ञांच्या मते सर्वसाधारण महिला किंवा गर्भवती जर धुम्रपान करत असेल (अ‍ॅक्टिव्ह स्मोकिंग) तर तिला जितका धोका आहे, तितकाच धोका घरामध्ये इतर कोणी धुम्रपान करत असेल (पॅसिव्ह स्मोकिंग) तरीदेखील आहे. कारण, दुसर्‍याने धुम्रपान केल्याने त्याच्या धुरापासूनही गर्भवतींना व तिच्या होणार्‍या बाळासाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून धुम्रपान न करणे आणि जेथे कोणी धुम्रपान  करत असेल त्यापासून दुर राहणे हा एकमेव पर्याय आहे.

काय आहे दमा

‘दमा’ म्हणजे दम लागणे किंवा जोराचा श्वास लागणे होय. या आजारात श्वासनलिका आकुंचन पावल्याने श्वासोच्छवासाला अडथळा येतो. त्यामुळे हवेची आतबाहेर ये-जा पुरेशा प्रमाणात होत नाही; तसेच फुप्फुसांमध्ये रक्तातल्या वायूंची देवाण घेवाणही होत नाही. त्यामुळे दम लागतो.

दम्याची लक्षणे

पावसाळा किंवा ढगाळ वातावरणात दम लागणे.  छातीतून सूं-सूं असा आवाज येणे.  छाती जड होण्यामुळे दम लागणे. कोरडा खोकला येणे ही लक्षणे रात्रीच्या वेळी जास्त असणे.

दम्याचे निदान

 फुप्फुसाची तपासणी, स्किन टेस्ट, रक्‍त तपासणी (आयजीई), थुंकी तपासणी

Tags : Pune, Smokers,  women, IT, babies, asthma, risk