Fri, Jul 19, 2019 17:51होमपेज › Pune › ‘आरटीओ’त बसविणार ‘स्मोक डिटेक्टर’

‘आरटीओ’त बसविणार ‘स्मोक डिटेक्टर’

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 12:38AMपुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयात आठवड्यात सलग दोन आगीच्या घटनांमुळे अनेक कागदपत्रांची राखरांगोळी झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कार्यालयात आगीची पूर्वकल्पना मिळण्यासाठी स्मोक डिटेक्टर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी इमारतीची पाहणी करण्यात आली  असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली आहे.राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या आरटीओ कार्यालयात सलग दोन वेळा आग लागल्यामुळे इमारतीच्या अग्नीविरोधी यंत्रणेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे इमारतीचे तत्काळ फायर अ‍ॅण्ड सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच  खबरदारीसाठी रात्रीच्या वेळेला कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

तळ मजल्यावरील कागदांचा ढिगारा हलविणार कधी?

आरटीओ इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या एका विभागात सलग दोन वेळा आग लागली होती. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाकडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा  वापर करण्यात आला होता. त्यात कागदपत्रांचे गठ्ठे पूर्णतः भिजले आहेत. अद्यापही कागदपत्रांचे गठ्ठे एकाच ठिकाणी असल्यामुळे भिजलेल्या कागदांचा ढिगारा हलविणार कधी, अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येत आहे.