Tue, Apr 23, 2019 00:03होमपेज › Pune › स्मार्ट शहराचे स्मार्ट नेतृत्व : आ. महेश लांडगे

स्मार्ट शहराचे स्मार्ट नेतृत्व : आ. महेश लांडगे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

राजकारण हा काही नाकासमोर जाणारा रस्ता नव्हे. त्याला अनेक वेडीवाकडी वळणे असतात. मागून काहीच मिळत नाही. इप्सित गाठण्यासाठी आपल्याला जे हवे ते पदरात पाडून घेण्यासाठी कधी कधी पराकोटीचा संघर्ष करावा लागतो. अशाच संघर्षातून भोसरीच्या लाल मातीतला पै. महेशदादा यांच्यातला कार्यकर्ता घडला. या कार्यकर्त्याचा नगरसेवक... स्थायी समिती अध्यक्ष... अन् आमदार एवढेच नव्हे, तर तरुणांमध्ये प्रचंड ‘क्रेझ’ असलेला पिंपरी-चिंचवड शहराचा नेता हा प्रवास त्यांच्या चाहत्यांसाठीच नव्हे, तर राजकारणात मोठी महत्त्वाकांक्षा बाळगून असणार्‍या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. 

आमदार म्हणावे, तर गडी भरभक्कम आणि गडी भरभक्कम म्हणावे, तर हा मुळातच पैलवान अशा महेशदादा लांडगे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून. एनएसयूआयचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष या नात्याने महेशदादांनी काम केले. सन 2002 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उडी घेतली; मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला, तरीही निराश न होता त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. सन 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन आ. गजानन बाबर यांच्या विरोधात विलास लांडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली.

ही निवडणूक जिंकण्यासाठी लांडे यांनी भोसरीतील ताकदीचे कार्यकर्ते असलेल्या महेशदादा लांडगे यांच्याशी जुळवून घेतले. महेशदादा व त्यांच्या पाठीशी असलेल्या तरुणवर्गामुळे लांडे यांचा विजय सुकर झाला. विलास लांडे यांनी आमदार झाल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने 2004  मध्ये पोटनिवडणूक झाली. तेथून महेशदादा लांडगे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले अन् मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सन 2007 आणि सन 2012 च्या पालिका निवडणुकीत त्यांनी आपली विजयाची परंपरा कायम राखली. त्यांनी ‘क’ प्रभाग समितीचे अध्यक्षपद आणि पुढे संघर्षातून पालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले.

खरे तर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत महेशदादा भोसरी मतदारसंघातून इच्छुक होते; पण पक्षाने माजी महापौर मंगलाताई कदम यांना उमेदवारी दिली. विलास लांडे यांनी बंडखोरी केली व विजयही मिळविला. मात्र, राजकारणात संघर्षाबरोबरच संयम अंगी असलेल्या महेशदादा यांनी थोडे थांबणे पसंत केले.राजकारणात पटाईत असलेल्या महेशदादांनी भोसरीच्या राजकारणाचा बारकाईने अभ्यास केला. विलास लांडे यांच्यावर नाराज असलेल्या सर्वपक्षीय नाराजांची मोट बांधली आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीयांच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेऊन विजयही मिळविला. 

भाजपचे संलग्न सदस्यपद स्वीकारलेल्या महेशदादा यांनी पालिका निवडणुकीत ‘लक्ष’ घातले. भोसरी आणि मतदारसंघातील ग्रामीण पट्ट्यात महेशदादांच्या शब्दाला मान असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले. भोसरी मतदारसंघात 44  जागांपैकी 33 जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले. यातील 25 नगरसेवक महेशदादा लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत. राजकारणात नेतृत्वाने आपल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असते,  त्यांना वार्‍यावर सोडायचे नसते, हे संघर्षातून मोठे झालेल्या महेशदादांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. पालिका निवडणुकीनंतर महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये महेशदादा समर्थक नगरसेवक नितीन काळजे, भाजप शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगतापांचे समर्थक नामदेव ढाके यांच्यात स्पर्धा होती.

ढाके यांचे नाव निश्‍चित झाल्याचे वृत्तही पसरले होते; मात्र महेशदादा लांडगे यांनी राजकारणात प्रसंगी वापरावी लागणारी सर्व अस्त्रे वापरली व महापौरपदी आपले कट्टर समर्थक चर्‍होली येथून निवडून आलेल्या नितीन काळजे यांची वर्णी लावून घेतली. ग्रामीण भागाला न्यायही दिला. त्याच वेळी महेशदादा लांडगे यांनी स्वत:ला एक खंबीर नेतृत्व म्हणून सिद्ध केले. महेशदादा यांची जनमानसात मिसळण्याची, राजकारणात काम करण्याची पद्धती, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राविषयीची आस्था, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची मानसिकता पाहून दिवंगत शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पिंपरी-चिंचवड शहराला महेशदादांच्या रूपाने खरेच एक खंबीर नेतृत्व लाभले आहे. राजकारणात महत्त्वाकांक्षा बाळगून पुढे जाणार्‍या महेशदादा लांडगे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त त्यांनी मनाशी बाळगलेले मंत्रिपदाचे स्वप्न साकार होवो. महेशदादांना उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना!