Thu, May 23, 2019 14:22
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › जिल्ह्यात उभारणार ‘स्मार्ट’ अंगणवाड्या

जिल्ह्यात उभारणार ‘स्मार्ट’ अंगणवाड्या

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:05AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

प्राथमिकपूर्व शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांत स्मार्ट अंगणवाड्यांची उभारणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने 100 अंगणवाड्यांच्या बांधकामाचा खर्च करण्यात येणार आहे. सामाजिक दायित्व निधीद्वारे (सीएसआर फंड) अंगणवाड्यांची उभारणी करण्यात येणार असून, बालकांसाठी बोलक्या भिंती, परसबाग, खेळण्याची मांडणी परिसरात करण्यात येणार आहे.  महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके यांनी ही माहिती  दिली आहे.

जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये सुमारे 4 हजार 300 अंगणवाड्यांमधून लाखो विद्यार्थी मूळाक्षरे गिरवीत आहेत. त्यापैकी तीन हजार इमारती जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत. तर नवीन 489 अंगणवाडी इमारतींचे बांधकाम सुरू आहे.  स्मार्ट अंगणवाडी उभारणीसाठी विविध निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. अंगणवाडी उभारणीस ग्रामपंचायत ठराव, तीन गुंठे जागा असलेला सात-बारा आणि आठ अ, ग्रामपंचायत मागणी पत्राची आवश्यकता आहे. पंचायत समितीच्या विभागाकडे कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. अंगणवाडी बांधणीला 10 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे अंगणवाडीशिवाय भाडोत्री इमारतीत मूळाक्षरे गिरविणार्‍या बालकांना हक्काचा निवारा मिळणार आहे.