Mon, Aug 19, 2019 00:53होमपेज › Pune › ‘पार्कीग झोन’ धोरणाविनाच स्मार्ट सिटीची धाव

‘पार्कीग झोन’ धोरणाविनाच स्मार्ट सिटीची धाव

Published On: Jan 15 2018 1:43AM | Last Updated: Jan 15 2018 1:43AM

बुकमार्क करा
पिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड शहर चारी बाजूने झपाट्याने विकसित होत आहे. लोकवस्तीमुळे नागरीकरण वाढत असल्याने वाहनांची संख्येत दरवर्षी लाखोंने भर पडत आहे. परिणामी, पुणे शहराच्या तुलनेत प्रशस्त असलेले रस्ते अपुरे पडत आहेत. त्यातच शहरात ‘पार्कीग झोन’ (वाहनतळ क्षेत्र) धोरणच अस्तित्वात नसल्याने वाहन कोठेही पार्क करण्याची बेशिस्ती वाढीस लागली आहे. महापालिका स्थापनेस 35 वर्षे उलटूही पार्कीग झोनअभावी स्मार्ट सिटीची कल्पना करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. 

औद्योगिकनगरीचे एकूण क्षेत्रफळ 181 चौरस मीटर आसून, लोकसंख्या 23 लाखांवर गेली आहे. वाहनांची संख्या 18 लाखांच्या आसपास आहे. प्रत्येक घरटी किमान एक किंवा दोन वाहने आहेत. वाहनांची बेसुमार वाढती संख्या लक्षात घेता पार्कींगची समस्या बिकट बनली आहे. पुरेशा पार्कीगअभावी वाहने रस्त्यांवर किंवा मोकळ्या जागेत पार्क केली जातात. अनेकदा रस्त्यावर वाहनांची दुहेरी पार्कीग केले जाते.  

त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन कोंडीत भर पडत आहे. पुणे मेट्रो, बीआरटीएसच्या लेनमुळे आणि बेशिस्त वाहन पार्कींगमुळे पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील निगडी ते दापोडी मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची आहे. पिंपरी कॅम्प  या मुख्य बाजारपेठेत पार्कीगच नसल्याने वाहने रस्त्यावर लावल्याने वाहतुक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. असेच चित्र चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, पिंपळे सौदागर, वाकड, काळेवाडी, दापोडी, सांगवी असा अधिक वर्दळीच्या रस्त्यावर दिसत आहे. निवासी भागात  घराजवळील रस्त्यावर वाहन पार्क केल्याने अंतर्गत रस्ते अपुरे पडत आहेत. एमआयडीसी व वाहतुकनगरीत येणारे मालवाहतुकीचे अवजड वाहने रस्त्यावर पार्क केल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. रस्ते व पदपथावर बेवारस वाहने पडून असल्याने शहराच्या सौर्द्यास बाधा पोहचत आहे. 

पार्कीगसाठी महापालिकेने अनेक ठिकाणी जागा आरक्षित केल्या आहेत. मात्र, ते विकसित न केल्याने त्याचा वापर होत नाही. काही ठिकाणी बेकायदेशीपणे पार्कीग सुरू करून वाहनचालकांकडून शुल्क वसुल केले जात आहे. असेच एक इंदिरा गांधी उड्डाणपुलाजवळील बेकायदेशीरपणे सुरू असलेले पार्कीग क्षेत्रास महापालिकेने नुकतेच सील ठोकले आहे. बाजारपेठ, चौक, रूग्णालय, शैक्षणिक संस्था, महापालिका भवन आदी ठिकाणी पार्कीग नसल्याने वाहनचालक नाईलास्तव रस्त्यावर वाहने पार्क करून निघून जातात. रस्त्यावरील बेशिस्त पार्कीगमुळे अनेक लहान-मोठे अपघात होऊन शेकडो जण जखमी झाले आहेत. महापालिकेचे पार्कीग धोरण नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. 

एजन्सीमार्फत पार्कीगसंदर्भात सर्वेक्षण-
शहराचे पार्कींग धोरणाबाबत गेल्यावर्षी एका खासगी एजन्सीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डीपी आराखड्यानुसार कोठे, कसे पार्कीग क्षेत्र व नो पार्कींग क्षेत्र असेल ते निश्‍चित केले आहे. मुख्य व अंतर्गत रस्ते, बाजारपेठ, चौक, निवासी क्षेत्र आदी ठिकाणचे मोफत व सशुल्क असे वेगवेगळे धोरण आहे. सर्वेक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्याची माहिती जागतिक बॅकेच्या प्रतिनिधींना देण्यात आली आहे. त्यांच्या सुचनांनुसार त्यात आवश्यक बदल केले गेले आहेत. या संदर्भातील अहवालाचे आयुक्तांसमोर सादरीकरणही झाले आहे. अहवालास अंतिम स्वरूप दिल्यानंतर तो सर्वसाधारण सभेत मांडला जाईल, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.