Thu, Jul 18, 2019 21:20होमपेज › Pune › स्मार्ट सिटीत शंभर ‘ई-टॉयलेट’

स्मार्ट सिटीत शंभर ‘ई-टॉयलेट’

Published On: May 31 2018 1:45AM | Last Updated: May 31 2018 1:18AMपिंपरी : मुंबई येथील स्वयंसेवी संस्था पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत अद्यवयावत पद्धतीचे तब्बल 100 ‘ई-टॉयलेट’ बांधून देणार आहे. या टॉयलेटचा वापर नागरिकांना विनामुल्य करता येणार आहे. या ‘ई-टॉयलेट’ची देखभाल व दुरूस्ती तब्बल 15 वर्षे संस्था करणार आहे. 

या विषयाला स्थायी समिती सभेने बुधवारी (दि.30) मान्यता दिली. ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लॉयन्स ऑफ मुंबई इमेज’ या संस्थेच्या वतीने शहरात मोफत ई-टॉयलेट बांधून दिले जाणार आहेत. संस्था टॉयलेट उभारणीचा खर्च ‘सीएसआर’ निधीद्वारे उभारणार आहे. टॉयलेटची उभारणी, त्याची देखभाल व दुरूस्ती तसेच, स्वच्छता, सुरक्षा, वीज बिलाचा खर्च संस्था करणार आहे.  पालिकेस केवळ जागा उपलब्ध करून देऊन ड्रेनेज वाहिनी जोड द्यावा लागणार आहे. पालिकेला पाणीपुरवठा मोफत द्यावा लागणार आहे. ई-टॉयलेटमध्ये महिला व पुरूषांचे वेगवेगळे प्रत्येकी एक शौचालय व मुतारी असणार आहे. 

संस्थेसोबत या संदर्भात 15 वर्षांचा करार करण्यात येणार आहे. पालिका ज्या-ज्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देईल, त्या-त्या ठिकाणी संस्था ई-टॉयलेट बांधून देणार आहे. टॉयलेट दुरूस्ती, देखभाल, स्वच्छता आदी खर्च संस्था जाहिरातीच्या उत्पन्नातून मिळविणार आहे. टॉयलेटवर 10 बाय 10 फूट आकाराचे दोन जाहिरात फलक संस्था लावणार आहे. जाहिरात उत्पन्नातून सदर खर्च केला जाईल. मात्र, जाहिरात कर, परवाना आणि शुल्क आदींमध्ये पालिका कोणतीही सवलत देणार नाही. सदर रक्कम भरणे संस्थेला बंधनकारक आहे.