पुणे : प्रतिनिधी
शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीही पुढे सरसावली आहे. त्यासाठी शहर पोलिस आणि स्मार्ट सिटी कंपनी यांच्यामार्फत तातडीने अल्पमुदतीच्या उपाययोजना राबविण्याचा निर्णय पुणे स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) संचालक मंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. त्यानुसार येत्या दोन दिवसांत याबाबत बैठक होणार असून, त्यात यासंबंधीच्या तातडीच्या उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत.
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या काही दिवसांत अधिक गंभीर होत चालला आहे. त्यावर विविध उपाययोजना करूनही फारसा उपयोग होऊ शकलेला नाही. या गंभीर प्रश्नाबाबत पीएससीडीसीएलच्या बैठकीत चर्चा झाली. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी वाहतूक उपाय योजनांसंबंधीचा लेखा-जोखा या वेळी मांडला. तसेच यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाकडून अॅडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असून ही यंत्रणा प्रत्यक्षात येण्यासाठी जवळपास एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. त्यावर नगरविकास विभागाचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासंबंधीच्या उपाययोजना करण्यासाठी स्मार्ट सिटी, महापालिका आणि पोलिसांनी एकत्रित येऊन तातडीने अल्पमुदतीचा कृती आराखडा करावा अशा, सूचना या वेळी केल्या. त्यानुसार आता स्मार्ट सिटी प्रशासन आणि पोलिसांची येत्या दोन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे.
गणेशोत्सवातही मदत
प्रामुख्याने गणेशोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या कालावधीतही तातडीच्या उपाययोजना आणि पोलिसांना आवश्यक असलेली यंत्रणा तसेच इतर मदत स्मार्ट सिटीकडून उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.