Mon, May 20, 2019 18:49होमपेज › Pune › ‘स्मार्ट सिटी’ संचालक मंडळ बैठक शनिवारी

‘स्मार्ट सिटी’ संचालक मंडळ बैठक शनिवारी

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:22AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’च्या मुख्य वित्तीय अधिकारीपदी पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे; तसेच ‘स्मार्ट सिटी’ची कामे प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटला मान्यता देण्यात येणार आहे. त्यावर शनिवारी (दि.17) सकाळी दहाला होणार्‍या संचालक मंडळाच्या तिसर्‍या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. 

‘स्मार्ट सिटी’चे कामकाज केवळ कागदोपत्रीच; केंद्र, राज्य शासनाकडून अद्याप निधी नाहीच’ हे ठकळ वृत्त ‘पुढारी’ने बुधवारी (दि.14) प्रसिद्ध केले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आयोजित केली आहे. सभेपुढे विविध विषय आहेत. प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट नेमणुकीस मान्यता देणे. स्मार्ट सिटीच्या अर्थसंकल्पाचा नमुना निश्‍चित करणे. महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नेमणूक करणे. कंपनी कायद्यानुसार जीएसटी व सर्व्हिस टॅक्सची आकारणी करणे, आदी विषय बैठकीत आहेत. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंच्या जागी नयना गुंडे यांची नियुक्ती झाल्याने त्यांची संचालक म्हणून मान्यता देणे; तसेच ‘स्मार्ट सिटी’संदर्भातील इतर विषय पत्रिकेवर आहेत. 

दरम्यान, दोन कोटी रुपये पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वळते करण्यासाठी महापालिकेने त्यांना 3 ते 4 वेळा पत्रे पाठविली आहेत; मात्र त्यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद न दिलेला नाही, असे ‘स्मार्ट सिटी’चे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण यांनी सांगितले. ‘स्मार्ट सिटी’साठी अद्याप कार्यालयाचा शोध सुरू आहे. महापालिकेच्या शहरातील इमारतीमध्ये कार्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे. केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळण्याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे. त्यास लवकरच प्रतिसाद मिळेल, असे त्यांनी सांगितले; तसेच ‘स्मार्ट सिटी’तील विविध कामांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. 

कंपनी सेक्रेटरीपदी नागपूरचे पराग धासरवार

‘स्मार्ट सिटी’च्या कंपनी सेके्रटरीपदी नागपूरचे अधिकारी पराग धासरवार यांची नियुक्त करण्यात आली आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी आहे. त्यांना मासिक 25 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. नागपूर मेट्रो व नागपूर महापालिकेचा त्यांना अनुभव आहे. निविदा काढून हे पद भरण्यात आले आहे, असे नीलकंठ पोमण यांनी सांगितले.