Fri, Jul 19, 2019 15:40होमपेज › Pune › ‘फिक्की’सोबत स्मार्ट सिटीचा करार 

‘फिक्की’सोबत स्मार्ट सिटीचा करार 

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 07 2017 12:00AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड  स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅन सिटीनुसार विकास केला जाणार आहे. त्यासाठी देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तांत्रिक मार्गदर्शन व साह्य घेण्यात येणार आहे. तसा सामंजस्य करार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन (पीसीएससीसी) आणि दिल्ली येथील फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑक कॉमर्स अ‍ॅण्ड इंड्रस्टी (एफआयसीसीआय-फिक्की) मंगळवारी (दि.5) करण्यात आला.

या संदर्भात स्मार्ट सिटीचे संचालक आणि फिफा संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक महापालिका भवनात झाली. या वेळी महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी अध्यक्षा सीमा सावळे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी नीलकंठ पोमण, फिक्कीचे  संचालक निरजा सिंग, थिसेन क्रुपचे के. पी. पिलाई, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशनचे पी. शेखर, लार्सन्स अ‍ॅण्ड टुब्रोचे जेम्स कॅटॉन, सिस्कोचे संतोष सिंग व प्रणव देसाई, टेक महिंद्राचे शैलेंद्र चेपे, केपीआयटीचे संग्राम कदम व आब्बास रावत, टायको सिक्युरीटीचे स्निग्धोदेव भट्टाचार्य, मायक्रो सॉफ्ट इंडियाचे दिप्ती दत्त आदी उपस्थित होते.

या बैठकीत आयुक्त हर्डीकर यांनी स्मार्ट सिटीचे प्रात्यक्षिक सादर केले. फिक्की संघटना ही देश-विदेशातील स्मार्ट शहरांना तांत्रिकदृष्ट्या विनामोबदला मदत करते. करारानुसार संघटनेच्या वतीने प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे. स्मार्ट सिटीत बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असल्याने विविध प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे महापौर काळजे यांनी सांगितले. 

कंपन्यांचे विनामोबदला पाठबळ स्मार्ट सिटीतील आवश्यक असलेले विविध प्रकल्पासाठी फिक्कीची नेमकी कोठे गरज आहे, याचा शोध घेऊन मदत करणार आहे. प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून तांत्रिकदृष्ट्या फिक्की सहकार्य करणार आहे. प्रकल्पाचे धोरण व दिशा ठरविण्यात त्यांचे योगदान असणार आहे. हे सहकार्य विनामोबदला असणार असून, करारात आर्थिक बाबींचा समावेश नाही.