होमपेज › Pune › स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापनेस मान्यता

स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापनेस मान्यता

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:48AMपिंपरी : प्रतिनिधी

स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्प व योजनांवर चर्चा करून सल्ला व सूचना देण्यासाठी स्मार्ट सिटी अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापनेस (स्थानिक सल्लागार समिती) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या फोरममध्ये शहरातील सर्व खासदार व आमदारांचा समावेश असणार आहे. स्मार्ट सिटीची बैठक सोमवारी (दि.30) झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असावा, या उद्देशाने शहर पातळीवर अ‍ॅडव्हायजरी फोरम स्थापन करण्यात येणार आहे. हा फोरम स्मार्ट सिटीतील नियमानुसार स्थापन केला जाणार आहे.

त्यामध्ये शहरातील लोकप्रतिनिधींपैकी खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर नितीन काळजे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा समावेश असणार आहे. त्यांच्याबरोबर नोंदणीकृत हाउसिंग सोसायटी महासंघ, करदाता महासंघ, झोपडपट्टी महासंघ किंवा स्वयंसेवी संस्था, महिला मंडळ किंवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्‍यांमधून केवळ  एक सदस्य फोरममध्ये निवडला जाईल. फोरमची दर महिन्यास बैठक घेण्यात येणार आहे. फोरमकडून आलेले प्रस्तावांचा विचार करून स्मार्ट सिटीमध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प व योजना राबविल्या जाणार आहेत. 

Tags : Pimpri, Smart City, Advisory, Forum ,Establishment, Recognition