Tue, Sep 25, 2018 06:39होमपेज › Pune › स्मार्ट सायकलींची अव्वाच्या सव्वा भाडेवाढ

स्मार्ट सायकलींची अव्वाच्या सव्वा भाडेवाढ

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 19 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी

स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सार्वजनिक सायकलींच्या भाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली आहे. धक्‍कादायक म्हणजे स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिका यांना अंधारात ठेवून ही भाडेवाढ करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर पुणे विद्यापीठ परिसर आणि औंध भागात भाडेतत्त्वावरील सायकल योजना डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आली. त्यानंतर महापालिकेनेही ही योजना सुरू केली. त्यानुसार सद्य:स्थितीला शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कृषी महाविद्यालय परिसर, विधी महाविद्यालय रस्ता; तसेच मगरपट्टा सिटी आदी भागात ही योजना सुरू करण्यात आली आहे. 

या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात पेडेल कंपनीने अर्धा तासास 1 रु. तर 1 तासाचा 2 रु. इतका दर ठेवला होता, मात्र, त्यात तिप्पट वाढ केली असून, अर्ध्या तासास 3 रु. तर 1 तासास 6 रु. इतका दर आकारण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. या कंपनीच्या तब्बल 1 हजार सायकली शहराच्या विविध भागात आहेत. 

ओफो या कंपनीच्या शहरात 600 सायकली आहेत, या कंपनीनेही मोठी भाडेवाढ केली आहे. या कंपनीकडून वीस मिनिटीला 5 रुपये तर प्रत्येक तासाला 15 रुपये इतका दर आकारला जात आहे. याशिवाय ‘युलू’ या कंपनीच्याही तब्बल 800 सायकली असून या कंपनीकडून पहिल्या दहा फेर्‍या मोफत असून त्यानंतर प्रत्येक अर्ध्या तासाला 5 रुपये तर एक तासाला 10 रुपये इतका दर आकारण्यास सुरवात केली आहे.

एकीकडे या कंपन्यांनी भरमसाठ भाडेवाढ केली असताना स्मार्ट सिटी कंपनी मात्र अंधारात असल्याचे समोर आले आहे. कंपनीकडून अर्ध्या तासाला केवळ 1 रुपया इतका दर आकारण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत होता, प्रत्यक्षात  सायकल कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी मात्र भाडेवाढ केली असल्याचे सांगितले.