Fri, Apr 26, 2019 03:53होमपेज › Pune › नवीन इमारतीच्या गॅलरीच्या स्लॅबचा तुकडा तुटला

नवीन इमारतीच्या गॅलरीच्या स्लॅबचा तुकडा तुटला

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:18AMपुणे : प्रतिनिधी

उद्घाटन समारंभातच गळतीचे ग्रहण लागलेल्या महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील गॅलरीच्या स्लॅबचा तुकडा बुधवारी सायंकाळी तुटून खाली पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत एक महिला कर्मचार्‍याला दुखापत झाली. मात्र, अशी घटना घडलीच नसल्याचे सांगत प्रशासनाकडून हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. 

महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीचे गत आठवड्यात उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र, या समारंभातच नवीन सभागृहात गळती झाल्याने सत्ताधार्‍यांवर आणि प्रशासनावर नामुष्की ओढावली. मात्र, आता उद्घाटनानंतर या इमारती मागील शुल्ककाष्ट संपण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर सभागृहातील तसेच लिफ्ट आणि त्यामधील आतील डक्टचे काम सुरू होते.

यावेळी मशीनच्या हादरा बसून इमारतीच्या मनपा बसस्थानकाच्या बाजुच्या प्रवेशद्वाराकडील डाव्या बाजूला असलेल्या तिसर्‍या मजल्यावरील गॅलरीचा खालच्या बाजूचा स्लॅबच्या प्लास्टरचा सिमेंटचा मोठा तुकडा तुटला आणि तो खालील बाजूस राडारोडा उचलणार्‍या एका महिला कामगाराच्या अंगावरच पडला. त्यामुळे या महिलेच्या खांद्याला किरकोळ स्वरुपाची दुखापत झाल्याचे याठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, या घटनेनंतर पालिकेच्या अधिकार्‍यांनी असे काहीच घडले नसल्याचे दावा केला.  दरम्यान सभागृहाच्या गळतीमुळे महापालिकेची ही इमारत सर्वेत्र चर्चेचा विषय बनली होती. त्यावर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी वेगवेगळी कारणे देत वेळ मारुन नेली होती. आता त्यात पुन्हा गॅलरीचा स्लॅब कोसळल्याने या इमारतीच्या निकृष्ट कामावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाला आहे.

स्ट्रक्‍चरल ऑडिटमधून वस्तुस्थिती कळणार

उद्घाटन समारंभातील गळती प्रकरणानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इमारतीचे काम नक्की कसे झाले आहे, हे स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.