Thu, Apr 25, 2019 11:40होमपेज › Pune › इंग्लंडच्या मासिकात  राजगड किल्ल्याचे स्केच

इंग्लंडच्या मासिकात  राजगड किल्ल्याचे स्केच

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी

इंग्लंडमधील ‘गुड वर्ड्स’ या मासिकात राजगड किल्ला, बालेकिल्ल्यांचे स्केच आढळून आले आहेत. किल्ल्यांचे हे स्केच 1859 ते 1866 च्या दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीचे पुणे येथे कार्यरत असलेले फ्रान्सिस गेल या ब्रिटिश अधिकार्‍यांनी रेखाटलेली आहेत. 1878 साली प्रकाशित झालेल्या या मासिकाची मूळ प्रत इंग्लंडमधील एका पुस्तक संग्राहकाकडे मिळाले असून, त्यातील स्केचच्या आधारे आपल्याला गडावर सुधारणा करता येतील, अशी माहिती गड, किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रसाद दांगट यांनी दिली.

गड, किल्ले संवर्धन समिती संचलित राजगड, रायगड संवर्धन मोहीमकडून गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी दांगट बोलत होते. या वेळी राहुल पवार, करण बांदल, भारत मांडे आदी उपस्थित होते. दांगट म्हणाले, समितीच्या वतीने गड, किल्ले संशोधन करणारा गट तयार करण्यात आला आहे. या गटामार्फत संशोधन सुरू असते.   गेल यांनी सिंहगड, तोरणा, राजगड, पुरंदर येथे भेटी दिल्या होत्या. त्यावेळी हे स्केच काढले आहेत. फ्रान्सिस गेल यांनी बेळगाव येथील सेंट मेरी चर्चचेदेखील डिझाईन केले आहे. हे चर्च 1869 मध्ये बांधून पूर्ण झाले. गेल यांनी किल्ल्यावर भेट दिल्यानंतर भेटीचे प्रवास वर्णन गुड वर्ड्स नावाच्या मासिकात केले आहे. त्याची मूळ प्रत इंग्लंडमध्ये मिळाली आहे. त्याआधारे किल्ल्याची पुनर्बांधणी करता येणे शक्य आहे. राहुल पवार म्हणाले,   किल्ल्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून पुनर्बांधणी संदर्भात दुर्मीळ ऐतिहासिक पुरावे शोधण्याचे काम करीत आहेत.