Mon, Mar 25, 2019 13:58होमपेज › Pune › सहा वर्षांनंतर प्रेमी दाम्पत्याची गळाभेट

सहा वर्षांनंतर प्रेमी दाम्पत्याची गळाभेट

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:13AMयेरवडा : वार्ताहर 

सहा वर्षांपूर्वी रागाच्या भरात घरातून बाहेर पडलेल्या रेणुकादेवीने (नाव बदलले आहे) आपल्यावर जिवापाड प्रेम करणार्‍या पतीला समोर पाहिले आणि त्या दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला. सहा वर्षांचा विरह सोसणार्‍या पतीला त्या सहा वर्षांत मानसिक आजाराशी झगडणार्‍या आपल्या पत्नीच्या सुधारलेल्या अवस्थेमुळे दिलासा मिळाला आणि एका प्रेमी युगुलाच्या आयुष्याची गाडी पुन्हा एकदा सुखाच्या ‘ट्रॅक’वर परतली.

रेणुकाला दोन मुली व एक मुलगा आहे. एका घटनेनंतर रेणुकाचे मानसिक संतुलन बिघडले आणि तिने तीन वर्षांच्या मुलीला घेऊन घर सोडले. सहा वर्षांपूर्वी घरातून ती बेपत्ता झाली. बेसावध मानसिक स्थितीत फिरत असताना रेणुकाबरोबर असलेली तिची मुलगी कोणत्यातरी रेल्वे स्टेशनवर हरवली. त्यानंतर रेणुका तशाच अवस्थेत इकडे-तिकडे भटकू लागली. यातच तिच्या परिस्थितीचा समाजकंटकांकडून गैरफायदा घेतला गेला अन् ती गरोदर राहिली. अशाच अवस्थेत ती स्वारगेट पोलिसांना दोन वर्षांपूर्वी सापडली होती.

स्वारगेट पोलिसांनी तिला शिवाजीनगर कोर्टामार्फत प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथे दाखल केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनोविकारतज्ज्ञ डॉ. वर्षा बेडगकर यांच्या निरीक्षणात तिच्यावर उपचार सुरू झाले. उपचारादरम्यान डॉक्टरांना रुग्ण दाखल करते वेळीच तीन महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. त्याचेही तिला भान नव्हते.अशा वेळी वॉर्डमधील वैद्यकीय अधिकारी, समाजसेवा अधीक्षक सिस्टर, मावशी यांनी अवश्यक ती काळजी घेऊन उपचार चालू ठेवले. आणि जून 2017 ला रेणुकादेवीला कन्यारत्न झाले. रुग्ण बाळाची काळजी घेण्यास असमर्थ असल्यामुळे तिचे बाळ एका संस्थेत संगोपनासाठी ठेवण्यात आले आणि तिच्यावर उपचार सुरूच ठेवलेे.

समाजसेवा अधीक्षक अपर्णा संभुदास यांनी रेणुकाला हळूहळू बोलते केले, तेव्हा तिचे सासर (पाटणा), तर माहेर (पश्चिम बंगाल) असल्याची माहिती तिच्याकडून मिळाली. येथील थोडी थोडी माहिती देऊ लागली. या महितीवरून अपर्णा संभुदास व प्रवीण देशपांडे यांनी वारंवार पाटणा पोलिसांशी संपर्क साधून अखेर रुग्णाच्या पतीचा शोध लावलाच.रेणुकादेवीचे पती जयंतकुमार यांना माहिती मिळताच ते योग्य कागदपत्रांसह तत्काळ पुण्यात दाखल झाले. ओळखपरेड दरम्यान दोघांनीही एकमेकांना ओळखले आणि अक्षरशः दोघांचाही बांध फुटला. प्रेमविवाह करणार्‍या या जोडप्याला आपल्या आयुष्यात कधी असे वळण येईल, असे दोघांना स्वप्नातदेखील वाटले नव्हते.

रेणुकादेवीच्या पतीला पुण्यात आल्यावर घरापासून सहा वर्षांपासून दूर राहिलेल्या पत्नीवर ओढवलेल्या दुर्दैवी परिस्थितीची माहिती कळाली. समाजसेवा अधीक्षकांच्या समुपदेशनाने त्याने परिस्थिती समजून घेतली व पत्नीला सावरले. आनंदाने त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार करून तिला घरी घेऊन गेले. त्यांना दुःख फक्‍त याच गोष्टीचे राहिले की, रेणुकादेवीची तीन वर्षांची हरवलेली चिमुकली अद्यापही सापडलेली नाही. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस म्हणाले, समाजसेवा अधीक्षक विभागामार्फत जास्तीत जास्त अनोळखी मनोरुग्णांचे कौटुंबिक पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. रेणुकादेवीला या परिस्तिथीतही पतीने स्वीकारले, हे तितकेच महत्त्वाचे आहे.