Fri, Jul 19, 2019 05:17होमपेज › Pune › पिंपरीत सहा टन गोमांस पकडले

पिंपरीत सहा टन गोमांस पकडले

Published On: May 30 2018 4:05PM | Last Updated: May 30 2018 4:05PMपिंपरी : प्रतिनिधी

अहमदनगरहुन मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन निघालेला टेम्पो बजरंग दलाच्या गोरक्षकांनी आणि पोलिसांनी अडवून जप्त केला. यामध्ये सहा टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथे करण्यात आली.

याप्रकरणी मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कसायांना सहकार्य करणार्‍या शेतकार्‍यांसह गायी कापणारा कसाई, गोमांस विकत घेणारा गनी भाई, टेम्पोचा चालक व मालक यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित १९९५ चे कलम ५ (क), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर येथून गोमांस मुंबई येथे विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री तीनच्या सुमारास कुणाल साठे, अभिजित शिंदे, उपेंद्र बलकवडे, सचिन जवळगे, गौरव पाटील, श्रीकांत कोळी, पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर सुर्यवंशी, आर. आर. ठुबल आणि पोलिस कर्मचार्‍यांनी टेम्पो (एमएच ०३, सीपी १६३०) सापळा रचून अडवला. 

पोलिसांच्या समक्ष पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे आणि शिवशंकर स्वामी यांनी टेम्पोची तपासणी केली. टेम्पोमध्ये गायी व बैलांची मुंडकी, मोठे मांस व पाय आढळले. पिंपरी पोलिसांनी टेम्पो चालक अब्दुल रहमान अति महंमद खान व क्लिनर अहसान महंमद यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, टेम्पोत सहा टन मांस आहे. हे मांस अहमदनगर येथून गायी व बैल कापून मुंबई येथील गनी भाई यांच्याकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.