Wed, Jun 26, 2019 11:39होमपेज › Pune › धुळ्यात सापडले शिवकालीन पत्र

धुळ्यात सापडले शिवकालीन पत्र

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 24 2018 12:20AMपुणे : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पत्रे स्वराज्याचा कारभार चालविणार्‍या कारभार्‍यांना लिहिली आहेत. महाराज दूरच्या ठिकाणी असणार्‍या कारभार्‍यांशी पत्राद्वारे संपर्कात असत. अशाच एका गावातील पाटीलकीचा उद्भवलेला वाद शांत करण्यासाठी महाराजांनी  एक पत्र मोडी भाषेत त्यांना पाठविले होते. ते पत्र धुळ्यातील समर्थ वाग्देवता मंदिर येथे सापडल्याचे इतिहास संशोधक घनश्याम ढाणे यांनी सांगितले.  

वसंत चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने इतिहास संशोधक घनश्याम ढाणे यांना सापडलेल्या इतिहासकालीन पत्राविषयी माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी डॉ. रजनी इंदुलकर उपस्थित होत्या.  या पत्राच्या वरच्या बाजूला संस्कृत भाषेतील राजमुद्रा असून, डाव्या बाजूला मोरोपंतांची मुद्रा आहे. पत्राच्या अखेरीस मर्यादाची मुद्रा असून, पत्राच्या मागील बाजूस मुस्लिम कालगणनेप्रमाणे तारीख लिहिलेली आहे.

त्यानुसार 2 फेब्रुवारी 1674 रोजी पत्र लिहिल्याचे स्पष्ट होते आहे. सुमारे 344 वर्षे जुने असलेल्या या पत्राच्या शाईचा दर्जा अतिशय उत्तम आहे. रायगडावरून पाली येथे पाठवलेले हे पत्र राज्याभिषेकाच्या पाच महिने आधीचे आहे.  खंडोबाची पाली येथे खराडे पाटील व काळभोर पाटील यांच्यात  तंटा सुरू होता. त्या पार्श्‍वभुमीवर महाराजांनी नागोजी पाटील कालभार(आत्ताचे काळभोर) यांना हे पत्र लिहिले आहे. कालभार यांची पाटीलकी खराडे पाटील हिरावून घेत होते. त्यासंदर्भात कालभार पाटलांनी छत्रपतींकडे तक्रार केली होती. शिवछत्रपतींनी 1673 मध्ये सातारा प्रांत स्वराज्यात आणून खराडे पाटलांना ताकीद पत्र आणि कालभार पाटील यांना हे सापडलेले पत्र अभयपत्र किंवा कौलनामा लिहिला आहे.