Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Pune › घरासमोर निवांत बसणे जिवावर बेतले 

घरासमोर निवांत बसणे जिवावर बेतले 

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:52AMपुणे : प्रतिनिधी

सायंकाळच्यावेळी घरासमोर  खुर्चीवर निवांत बसणे वृद्ध महिलेच्या जिवावर बेतले आहे.  कारण  सुसाट कारने उडवल्याने  जखमी होऊन उपचारादरम्यान या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. याच कारने काही अंतरावर पुढे जाऊन यू टर्न घेत परतताना दुचाकीस्वाराला धडक दिली. यात जखमी झालेल्या युवकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळावर वाहन जागीच सोडून  चालक फरार झाला. मुंढव्यातील सव्वातेरा नळी जहांगीरनगर येथे बुधवारी (दि. 3 एप्रिल) ही घटना घडली. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात कारचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिवकांत शंकर हुडे (वय 67, रा. भीमनगर) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे.   यासंदर्भात मुलगा चंद्रकांत हुडे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकांत हुडे या मुंढव्यातील सव्वातेरा नळी जहांगीरनगर येथील भीमनगर भागात राहण्यास आहेत. त्यांचे घर रस्त्यानजिक असून येथे वाहनांची नेहमी रहदारी असते. त्या बुधवारी (दि. 3 एप्रिल) नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरासमोर खुर्चीवर  चहा पिण्यासाठी बसल्या होत्या. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मारुती झेन कारने खुर्चीवर बसलेल्या शिवकांत हुडे यांना जबर धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. 

याच कारने काही अंतरावर पुढे जाऊन यू टर्न घेतला आणि परत येताना दुचाकीस्वाराला उडवले. यात विजय शिवाजी सकटे (वय 36, रा. वैदूवाडी, हडपसर) हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी पसिरातील नागरिक जमा होत असल्याचे पाहून चालक कार घटनास्थळी सोडून पसार झाला. त्यानंतर नागरिकांनी हुडे व सकटे यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. ससून रुग्णालयात शनिवारी उपचारादरम्यान गृहिणी असलेल्या शिवकांत हुडे या वृद्धेचा मृत्यू झाला. तर विजय सकटे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक अमित वाळके हे करत आहेत.