Wed, Jun 26, 2019 18:25होमपेज › Pune › सिंहगड रस्त्यावर पुन्हा दरडी कोसळल्या

सिंहगड रस्त्यावर पुन्हा दरडी कोसळल्या

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 12:48AMखडकवासला : प्रतिनिधी

संततधार पाऊस पडत असताना शनिवारी (दि. 14) सकाळी सात वाजेच्या सुमारास सिंहगडाच्या उंबरखिंडीतील कड्याच्या उन्मळलेल्या मोठ्या दरडी सिंहगडाच्या घाट रस्त्यावर पुन्हा कोसळल्या. त्यामुळे दगड मातीत संपूर्ण रस्ता गाडला गेला. 

इंग्रज राजवटीत तयार करण्यात आलेल्या सिंहगडाच्या घाट रस्त्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. वाहतूक बंद असल्याने दुर्घटना टळली होती. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. मागील रविवारीही (दि. 8) उंबरखिंडीत दरडी कोसळल्याने घाट रस्ता बंद करण्यात आला होता. आता आणखी आठ दिवस रस्ता बंद करण्यात आला आहे.

अलीकडच्या काळात सिंहगडावर दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक गर्दी करीत आहेत. दुसरीकडे धोकादायक दरडींमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षीही दरडी कोसळल्या होत्या. सुदैवाने मोठ्या दुर्घटना टळल्या, असे असतानाही उन्हाळ्यात धोकादायक दरडी काढण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. घाट रस्त्याचे रुंदीकरण केल्यापासून गेली 8 ते 9 वर्षे  पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. दरम्यान, वनखात्याने स्थानिक वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षक; तसेच वन कर्मचारी यांच्या मदतीने जेसीबी मशिन व डंपरच्या साहाय्याने दरडी काढण्याचे काम तातडीने सुरू केले आहे.

याबाबत वनखात्याचे उप वनसंरक्षक महेश भावसार म्हणाले, उंबरखिंडीत कड्याच्या मोठ्या दरडी उन्मळून आलेल्या आहेत. त्या काढण्यात येणार होत्या. सकाळी संततधार पावसामुळे उन्मळून आलेल्या त्या मोठ्या दरडी कोसळल्या. त्या काढण्यासाठी आठ दिवस घाट रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास दरडी कोसळल्याने घाट रस्ता पूर्णपणे बंद झाला. गडावरील वाहतूक ठप्प झाली. वनखात्याचे वनपरिमंडल अधिकारी हेमंत मोरे, बाळासाहेब जिवडे, नितीन गोळे आदींसह सुरक्षा रक्षकांनी दरडी काढण्यासाठी तातडीने धाव घेतली. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने दरडी काढण्याच्या कामातील अडथळे दूर झाले.

सध्या सिंहगड परिसरात पाऊस पडत असल्याने घाट रस्त्यावर धोकादायक उन्मळलेल्या दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्या काढाव्यात, अशी मागणी माजी जि.प. सदस्य नवनाथ पारगे व बाजीराव पारगे यांनी केली आहे.