Tue, Jul 23, 2019 06:27होमपेज › Pune › सिंहगड प्रशासनाकडून अध्यापकांना निलंबन नोटीसा

सिंहगड प्रशासनाकडून अध्यापकांना निलंबन नोटीसा

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 07 2018 11:27PMपुणे : प्रतिनिधी 

मुंबई उच्च न्यायालयाने सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या प्रशासनाला अध्यापकांना वेतन देण्याचे आदेश दिल्यावर एक महिना उलटून गेल्यानंतरही, अध्यापकांना वेतन देण्यात आले नाही. उलट अतिरिक्त असल्याचे कारण सांगत, 80 अध्यापकांना निलंबनाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तर 15 अध्यापकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

त्यामुळे अध्यापकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अध्यापकांनी प्रशासनाच्या विरोधात केलेल्या आंदोलनाचा सूड प्रशासन उगवत असल्याचे सांगत सोमवार दि.11 रोजी न्यायालयात जाणार असल्याची माहिती सिंहगड समन्वय समितीतर्फे देण्यात आली आहे.

सोसायटीच्या महाविद्यालयांमध्ये अध्यापक आणि कर्मचार्‍यांचे गेल्या 16 महिन्यांपासून वेतन न झाल्याने अध्यापक-कर्मचार्‍यांनी आंदोलन पुकारले होते. थकीत वेतनाची रक्कम मिळेपर्यंत आणि वेतन राष्ट्रीयीकृत बँकेमधून होण्यासाठी, अध्यापक-कर्मचार्‍यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सोसायटीवर प्रशासक नेमण्याची शिफारस केली, तर एआयसीटीई आणि डीटीईने आपल्या अधिकारांचा वापर करुन कारवाई केली. 

अध्यापक-कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. मात्र, प्रश्‍नावर तोडगा निघाला नाही. याबाबत कोणत्याच प्रकारचा ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्या 562 अध्यापकांनी न्यायासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायालयाने निकाल देत समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्तीची रखडलेली रक्कम अध्यापकांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात यावी किंवा न्यायालयामार्फत वेतन करण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी नाव आणि राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्याची माहिती अध्यापकांनी द्यावी, असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतर समाजकल्याण विभागाने न्यायालयात सुमारे 117 कोटी रुपये जमा केले.

त्यानंतर न्यायालयाने समाजकल्याण विभागाकडून येणारे पैसे फक्त अध्यापकांच्या पगारासाठी वापरण्यात यावे, असे स्पष्ट केले. या निर्णयाला एक महिना उलटून गेल्यानंतरही वेतन बँकेच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाही.  वेतन मिळत नसताना देखील केवळ विद्यार्थीहित लक्षात घेत अध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकविले. तसेच, टर्म ग्रँट करून त्यांच्या परीक्षा घेतल्या. मात्र, आता परीक्षा झाल्यावर उन्हाळी सुट्टीवर असलेल्या अध्यापकांना बदली, तसेच निलंबनाचे मेल पाठवण्यात येत आहेत.