Thu, Mar 21, 2019 23:45
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › कोंढणपूर-सिंहगड रस्त्यावर दरडी कोसळण्याची शक्यता 

कोंढणपूर-सिंहगड रस्त्यावर दरडी कोसळण्याची शक्यता 

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 12:49AMखेड शिवापूर : किरण दिघे

पावसाळा सुरू झाला की आठवण होते ती सिंहगडावर पर्यटनासाठी जाण्याची. अती उत्साही पर्यटक किल्ल्यावरील दरडींची माहिती न घेताच पर्यटनाला निघतात. परंतु, सावधान... कोंढणपूर अवसरीमार्गे सिंहगडावर जाणारा घाटरस्ता अद्यापही धोकादायकच आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या घाटरस्त्यातील दरडी सरंक्षित करण्याचे काम हाती घेण्यात आले होते; मात्र रस्त्यापासून केवळ 50 फूट अंतरापर्यंतच्या दरडींना जाळी लावण्यात आली असून अन्य काम तसेच पडून आहे. त्यामुळे या मार्गावर गतवर्षी झालेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार हे स्पष्ट झाले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूरलगत कोंढणपूरपासून सिंहगडाला जाण्यासाठी अवसरीमार्गे घाट रस्ता आहे. या मार्गावरील दरडी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कोसळल्या होत्या. त्यावेळी या दरडींच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते. त्यासाठी या दरम्यानची वाहतूक तीन महिने बंद केली होती. हे काम तीन महिने चालले. परंतु, त्यादरम्यान केवळ 40 ते 50 फूट एवढ्याच दरडीच्या भागात सरंक्षण जाळी टाकण्यात आली आहे. त्या पुढे व त्याच्यामागे इतर कोठेही संरक्षण जाळी टाकली गेली नाही. तीन महिन्यात फक्त सुमारे 40 ते 50 फुटच जाळी टाकण्यात आली का? हा मोठा प्रश्न आहे. 

दरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी अवसरवाडी ते सिंहगडदरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे; मात्र परिस्थिती वेगळीच आहे. हा रस्ता अर्धवट दुरुस्त केलेला आहे व झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. 

सिंहगडावर सध्या पर्यटकांची वर्दळ या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु या बाजूने जाताना रस्त्याची दुरवस्था व दरडी कोसळण्याच्या भीतीने काही पर्यटक माघारी फिरताना शनिवारी (दि. 30) या रस्त्याने पाहणी केली असता दिसून आहे, तर काही पर्यटक जीव मुठीत धरून गडावर गेल्याचे दिसले. सकाळीच या ठिकाणी वाहतुकीची रांग लागली होती. याच वेळी जर दरड कोसळली तर फार मोठा अनर्थ घडू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. यावरून सिंहगडावरील दरडी कोसळण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे हे सिद्ध होत आहे. यावेळी पर्यटकांनी दरड कोसळणार अशा ठिकाणी वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी केली.