Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Pune › सिंहगड घाटरस्ता रविवारपर्यंत बंद 

सिंहगड घाटरस्ता रविवारपर्यंत बंद 

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 11:05PMखडकवासला : वार्ताहर

सिंहगडाच्या  उंबरखिंडीतील  कड्याच्या  मोठ्या दरडी घाट रस्त्यावर कोसळण्याचा धोका वाढल्याने या  दरडी  काढण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. त्यामुळे सिंहगडचा घाट रस्ता रविवार (दि. 15) पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्या रविवारी (दि. 8) सिंहगड घाट रस्त्यावर उंबरखिंडीत कड्याच्या मोठ्या दरडी कोसळल्याने घाट बंद आहे.  गेल्या पाच दिवसांत कोसळलेल्या दरडी काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, ठिसूळ कड्याच्या दरडी कोसळल्या आहेत. त्या काढण्यासाठी  चार ते पाच दिवस लागणार असल्याचे वनखात्याने स्पष्ट केले आहे.वनखात्याचे उपवनसंरक्षक महेश भावसार यांनी सिंहगड घाट रस्त्यावर कोसळलेल्या दरडी व उंच उंबरखिंडीतील दरडींची पाहणी केली. वन  व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक यांच्यासह त्यांनी घाट रस्त्यावरील धोकादायक दरडी तसेच ढिसूळ कड्यांची पाहणी केली. 

भावसार म्हणाले, उंच कड्यातील धोकादायक दरडी कोसळण्याचा धोका आहे. या दरडी काढण्यासाठी मोठ्या जे. सी. बी. मशीनची गरज आहे. दरडीचा भाग उन्मळून आला आहे. त्यामुळे छोट्या मशिनच्या सहाय्याने दरडी काढणे धोक्याचे आहे. दरडी काढण्यासाठी तीन ते चार दिवस लागणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत सिंहगड घाट रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी (दि.16) पुन्हा घाट रस्त्याची पाहणी करून वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 

रविवारी कोसळलेल्या मोठ्या दरडी  हलविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.  वनखात्याचे वनपरिमंडल अधिकारी हेमंत मोरे, बाळासाहेब जिवडे, नितीन गोळे आदी सह सुरक्षारक्षक दरडी काढण्यासाठी भर पावसात धावपळ करत आहेत. सध्या सिंहगड परिसरात पाऊस पडत असल्याने घाट रस्त्यावरील धोकादायक उंबरखिंडीच्या  मोठ्या दरडी उन्मळल्या आहेत. त्या कोसळण्याचा धोका असल्याने त्या काढण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

दोन दिवसापूर्वी तळई उद्यानाजवळील घाट रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने काही काळ  अवसरवाडीकडे जाणारी  वाहतूक बंद झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे व स्थानिक कार्यकर्त्यांनी वनसंरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांंच्या मदतीने झाड बाजूला केले. सध्या पडत असलेल्या पावसामुळे धोकादायक दरडी काढण्यासाठी    घाट रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे.  त्यामुळे   पर्यटकांनी सहकार्य करावे. असे आवाहन वनखात्याने केले आहे.