Mon, May 20, 2019 22:05होमपेज › Pune › सिंहगड घाटत दरडींची टांगती तलवार

सिंहगड घाटत दरडींची टांगती तलवार

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:18AMखडकवासला : दत्तात्रय नलावडे

कोसळणार्‍या दरडी व खोल दरीच्या बाजूला अनेक ठिकाणी सुरक्षा कठडे नसल्याने सिंहगडचा घाट रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे पुणेकरांसह हजारो पर्यटकांचा जीव टांगणीला लागला आहे. ऐन पावसाळ्यात  गेल्या दहा वर्षांपासून दरडी कोसळल्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारच्या उदासीनतेमुळे घाट रस्त्याच्या दरडी संरक्षित करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ठप्प पडलेले प्रशासन पावसाळ्यात दरडी कोसळल्यानंतर खडबडून जागे होते.आणि ऐन गर्दीच्या दिवसात घाट रस्ता बंद ठेवला जात आहे. असे चित्र गेल्या पाच वर्षांपासून आहे.

दरडी संरक्षित करण्यासाठी 16 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने पावसाळ्यात दरडी कोसळल्या नंतर प्रशासनाला जाग येते. उन्हाळ्यात मात्र प्रशासन ठप्प पडत आहे. इंग्रज राजवटीत सिंहगडावर जाण्यासाठी घाट रस्ता तयार करण्यात आला. वनखात्याच्या मालकीचा घाट रस्ता व परिसर आहे. वनखाते घाट रस्त्याची दुरूस्ती व देखभाल करत आहे. पर्यटकांची वर्दळ वाढल्याने दहा वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घाट रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली. निधी उपलब्ध होईल त्या नुसार कामे केली जात आहेत घाट रस्त्याच्या  रूंदीकरणासाठी  तोडलेल्या कड्याच्या दरडी उन्मळून कोसळू लागल्या. गेल्या आठ दहा वर्षांपासून दरडी  कोसळत आहेत.  या पुर्वी दरडी कोसळत असत मात्र त्याचे प्रमाण कमी होते. रूंदीकरणानंतर तोडलेले कडेच कोसळू लागले आहेत. त्यामुळे दरडी कोसळल्याचे मोठे ग्रहण घाट रस्त्याला लागले आहे.    त्यामुळे घाट रस्ता वारंवार बंद करावा लागत आहे.

अलिकडच्या दहा बारा वर्षांत सिंहगडावर पुणेकरांसह  हजारो पर्यटकांची  वर्दळ वाढली आहे. त्यामुळे सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. गडावरील वाहनतळावर गाड्यांना जागा मिळत नाही.त्यामुळे थेट घाट रस्त्यावर वाहने उभी राहून प्रचंड वाहतूक कोंडी घाट रस्त्यावर होत आहे. शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर प्रचंड गर्दी होऊन घाट रस्ता ठप्प पडत आहे. पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत.  

सिंहगडाच्या घाट रस्त्यावर  गेल्या जुलै महिन्यात तीन वेळा उंबरखिंडीत मोठ्या दरडी कोसळल्या. पावसामुळे  काढण्यास अडथळे  येत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक वनसंरक्षण समिती व वनखात्याने खडतर परिश्रम घेत दरडी काढण्याचे काम  पूर्ण केले. सध्या पावसाचा जोर ओसरला असल्याने दरडी कोसळल्याचे प्रकार थांबले आहेत. असे असले तरी उन्मळून आलेल्या दरडी जोरदार पावसामुळे कोसळण्याचा धोका कायम आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागिय अभियंता एन.एम. रणसिंग म्हणाले , आय आय टी च्या तज्ञांनी    दरडी ची पाहणी केली आहे. त्याचा अहवाल मिळणार आहे. धोकादायक दरडी संरक्षकशित करण्यासाठी तसेच खोल दरी व वळणावर संरक्षित कठडे बांधण्यासाठी 16 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. गेल्या वर्षी 1 कोटी 62 लाख रुपये खर्च करुन पहिल्या टप्प्यातील दरडी लोंखडी जाळ्या बसवून संरक्षित करण्यात आल्या आहेत. सध्या 1 कोटी  31 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दरम्यान दरडी कोसळल्याने जवळपास महिनाभर बंद असलेल्या सिंहगड घाट रस्त्यावरील दरडी काढण्याचे काम पूर्ण झाल्याने घाट रस्त्यावरील वाहतूक सुरू करण्याची कार्यवाही वनखात्याने सुरू केली आहे. वनखात्याचे उप वनसंरक्षक महेश भावसार म्हणाले , पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी घाट रस्त्यावर कोसळणारया कड्याच्या  दरडी  संरक्षकशित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी  निधी उपलब्ध करून दिला जात आहे.