Tue, Jul 16, 2019 14:19होमपेज › Pune › सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा धोकादायक दरडी

सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा धोकादायक दरडी

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:29AMखडकवासला : दत्तात्रय नलावडे

पुणेकरांसह देशभरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक सिंहगडावर पावसाळी पर्यटनासाठी गर्दी करत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी घाट रस्त्याच्या उंच कड्यातील दरडी सुरक्षित करण्यात आल्या आहेत.असे असले तरी घाट रस्त्याच्या सुरूवातीच्या वळणावर ढिसूळ झालेल्या दरडी कोसळून लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.त्यामुळे पर्यटकांचा जीव टांगणीला लागला आहे. 

कमी पावसातही  घाट रस्त्याच्या रुंंदीकरणासाठी पाच वर्षांपूर्वी तोडलेल्या डोंगराच्या  ढिसूळ झालेल्या दरडी कोसळत आहेत. सध्या सिंहगड भागात ऊन्ह _पावसाचा लपंडाव सुरू आहे. तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. शनिवारी व काल रविवारी सुट्टीच्या दिवशी  हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी सिंहगडावर गर्दी केली होती. घाट रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने तब्बल आठ वेळा घाट रस्ता बंद करण्यात आला. शनिवारी रिमझिम पावसात  सकाळी मोठ्या दरडी कोसळल्या . जोरदार पाऊस नसल्याने दरडी तातडीने बाजूला करण्यात आल्य. जोरदार पावसात मात्र दरडी कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.  

वनखात्याचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे, सुरक्षारक्षक नितीन गोळे, संदीप सांबरे, गुलाब भोंडेकर, शंकर सांबरे,  उत्तम खामकर, नीलेश सांगळे,  नीलेश पायगुडे आदींनी घाट रस्त्यावर कोसळलेल्या दरडी बाजूला हटविल्या. त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुरू झाली. दरम्यान, घाट रस्त्यावर धोकादायक दरड कोसळत असल्याने पर्यटकांना सावधानतेचा इशारा वन खात्याने दिला आहे. 

वन खात्याचे पुणे विभागाचे उप  वनसंरक्षक महेश भावसार म्हणाले , घाट रस्त्याच्या तिसरया वळणावर ढिसूळ झालेल्या दरडी कोसळत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी घाट रस्त्यावर धोकादायक दरडी च्या ठिकाणी वन खात्याचे कर्मचारी तसेच स्थानिक वन संरक्षण समितीचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी असल्याने   डोणजे व अवसरवाडी मार्गे सिंहगड या दोन्ही घाट रस्त्यावर पर्यटकांनी वाहने उभी करू नयेत , गडाच्या वाहनतळावर बेशिस्तपणे वाहन उभी करू नये. यासाठी खबरदारी घेतली जात आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटकांची वर्दळ गडावर वाढली आहे. नरवीर तानाजी मालुसरे , छत्रपती राजासम महाराज  यांच्या समाधी चे दर्शन घेण्यासाठी तसेच गडावरील ऐतिहासिक वास्तू ,स्थळ पाहण्यासाठी विद्यार्थी, तरुण, कौटुंबिक सहली मोठ्या संख्येने येत आहेत.