होमपेज › Pune › सिग्‍नल व्यवस्थापनासाठी एकच अभियंता

सिग्‍नल व्यवस्थापनासाठी एकच अभियंता

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 11:48PMपुणे : प्रतिनिधी

शहरातील तब्बल 247 सिग्नल यंत्रणेच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेचा केवळ एकच अभियंता कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बंद पडलेले सिग्नल पुन्हा सुरू करण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे. परिणामी संबंधित परिसरातील चौकात वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून 350 चौकात सिग्नल यंत्रणा कार्यन्वित आहे. मात्र, पावसाळ्यात ठिकठिकाणच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने  वाहतुकीचा फज्जा उडत आहे. 

वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध चौकात 1 हजार 400 कर्मचारी तैनात आहेत. मात्र, पावसाळ्यात सिग्नल बंद पडणे, दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनांचे प्रमाण रस्त्यावर वाढणे, बेशिस्त वाहन चालकांमुळे अनेकांना दरदिवशी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. विशेषतः सिग्नल यंत्रणा बंद पडत असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. नादुरुस्त सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र, पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे काही चौकांत बंद पडलेले सिग्नल दुरुस्तीला मुर्हूत लागत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

फक्‍त पावसाळ्यात जादा कर्मचारी

सिग्नल दुरुस्तीसाठी एजन्सीकडे स्टाफची संख्या कमी असल्यामुळे ती वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे. फक्त पावसाळ्यात खासगी तत्त्वावर दोन जादा कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे सिग्नल दुरुस्तीला वेग मिळणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या स्थापत्य विभागात काम करणार्‍या एका अधिकार्‍याने दिली आहे.