Fri, Apr 19, 2019 12:47होमपेज › Pune › सभागृहात बोलू देत नसल्याने खासगी स्पीकर वापरणार : दत्ता साने 

सभागृहात बोलू देत नसल्याने खासगी स्पीकर वापरणार : दत्ता साने 

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 10:48PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आम्हाला बोलू देत नाहीत. आम्ही बोलू लागले की, माईक बंद केले जातात. त्यामुळे सभागृहाला आमचे बोलणे ऐकू जात नाही. सत्ताधारीची ही मुुकुटदाबी आम्ही सहन करणार नसून, त्यासाठी सभागृहात खासगी ‘स्पीकर’ आणण्याचा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे. 

सभागृहात अनेकदा विविध विषयासंदर्भात विरोधकांना बोलू दिले जात नाही. बोलण्यास उभे राहिल्यानंतर विद्युत विभागाच्या कर्मचार्‍यांचा इशारा करून माईक बंद केले जातात. त्यामुळे आमचे बोलणे संपूर्ण सभागृहासह पत्रकारांना ऐकू जात नाही. परिणामी, आमचे मत सभागृहापुढे येत नाही. असे प्रसंग वर्षभरात अनेकदा घडले आहेत. या संदर्भात महापौर नितीन काळजे यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. या कृतीतून भाजप सभाशास्त्राचे नियम पायदळी तुडवत आहे, असा आरोप साने यांनी केला.

माईक बंद झाला तरी, बोलता यावे म्हणून या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस स्पीकरचा वापर करणार आहे. माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनाही या स्पीकरचा वापर करता येणार आहे. त्यामुळे या पुढे भाजपला आमच्या आवाज दाबता येणार आहे, असे साने यांनी स्पष्ट केले.  स्थायी सभेतही बोलू दिले जात नसल्याचे सदस्य गीता मंचरकर व प्रज्ञा खानोलकर यांनी सांगितले. एकादा विषयासंदर्भात बोलू लागल्यास भाजपचे काही सदस्य थेट रोखतात. पुढील विषय पुकारून नव्याने चर्चा सुरू करतात. त्यामुळे आम्हाला बोलता येत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.