होमपेज › Pune › प्रेम संबंधाला अडसर ठरत असल्याने खून

प्रेम संबंधाला अडसर ठरत असल्याने खून

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 1:15AMपुणे : प्रतिनिधी

मुंडके नसलेल्या धडाची ओळख टी-शर्टवरून लावत, या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेम संबंधाला अडसर ठरत असल्याने हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, पोलिसांना तरुणाचे मुंडकेव इतर अवयव आणि गुन्ह्यातील शस्त्र अद्यापही सापडलेले नाही. निजाम आसगर हाशमी (वय 18, रा. आण्णाभाऊ साठेनगर, इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, उमेश भिमराव इंगळे (वय 20, रा. आण्णाभाऊ साठेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कोंढव्यातील खडीमशिन चौकात असलेल्या खड्ड्यात मंगळवारी (19 जून) दुपारी डोके नसलेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मृतदेहाचे डोके नसल्याने ओळख पटविणे अडचणी येत होत्या. मृतदेह सापडला त्या ठिकाणी पोलिसांना एक टी-शर्ट मिळाला होता. तर, बिबवेवाडी पोलिस ठाण्यात या वर्णनाचा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित तक्रारादरांकडे चौकशी केली. त्यावेळी हा मृतदेह उमेश इंगळे याचा असल्याचे समोर आले.  घटनेच्या दिवशी निजाम व उमेश हे एकत्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, परिमंडळ चारचे उपायुक्त दिपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलींद गायकवाड, उपनिरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी पृथ्वीराज पलांडे, गणेश गायकवाड, रिकी भिसे, आदर्श चव्हाण, अजमी शेख, प्रशांत कांबळे, जगदीश पाटील यांनी आरोपीचा माग काढत त्याला पकडले. त्यांने खूनाची कबूली दिली आहे.  

निजाम हाशमी आणि उमेश इंगळे हे दोघेही मित्र आहेत. निजाम स्लायडिंग विंडो बसविण्याचे काम करतो. तर, उमेश हा प्लबिंगचे काम करत असे. आरोपी निजाम याचे उमेश याच्या नात्यातील मुलीशी प्रेम संबंध होते. मात्र, उमेशला ते मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यात वाद होत असत. त्याचा राग निजामच्या मनात होता. या रागातूनच त्यांने खूनाचा कट रचला. शुक्रवारी (16 जून) सायंकाळी उमेशला ईदनिमित्त शिरखुर्मा खाण्याच्या बहाण्याने, गोड बोलून खडीमनिश चौकातील मोकळ्या जागेत नेले. त्याठिकाणी उमेशला ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे मुंडके धडापासून वेगळे केले. तसेच, मृतदेह खड्ड्यात टाकून दिला.

टी शर्टवरून  पटली ओळख

पोलिसांन घटनास्थळी रक्ताने माखलेला टी-शर्ट सापडला. त्यावर पाठिमागे इंग्रजीत रामराजे निंबाळकर 2017 श्री, एस. के. फलटण असे लिहीले होते. त्यानुसार, पोलिसांनी फलटण गाठले. बॉडी बिल्डींगच्या स्पर्धेत हे टी-शर्ट देण्यात आल्याचे समजले. सव्वाशे ते दिडशे तरुणांची माहिती पोलिसांनी घेतली. त्यात पुण्यातून या स्पर्धेसाठी कोण गेले होते याचा तपास करण्यात आला. त्याने स्पर्धेत रहिवाशी पुणे व मुळ पत्ता फलटण असा दिला होता. त्याचदरम्यान बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फलटण येथील तरुण बेपत्ता झाल्याची नोंद झाल्याचे समजले. त्यानुसार, नातेवाईकांना बोलवून ओळख पटविण्यात आली. 

मृतदेह स्विकारण्यास नातेवाईकांचा विरोध

उमेशचे शिर आणि गुप्प्तांग कापण्यात आले आहे. ते अद्यापही सापडलेले नाही. त्यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्याचे हे अवयव सापडल्याशिवाय मृतदेह स्विकारणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. यावरून ससून रूग्णालयात गोंधळही झाला. उमेशचे अवयव त्वरीत शोधावेत, याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन दिल्याचे पुणे शहर जिल्हा मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी अनिल हातगाळे यांनी सांगितले.