Sun, Jun 16, 2019 02:11होमपेज › Pune › रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम

रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम

Published On: Jun 27 2018 1:56AM | Last Updated: Jun 26 2018 11:46PMपिंपरी : प्रतिनिधी

रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे.  रिक्षा चालकामध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. सरकारने रिक्षा चालकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवावेत, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी येथे दिला.

मंगळवारी (दि.26)  सकाळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात  रिक्षाचालकांच्या प्रश्नावर महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने  निदर्शन आंदोलन करण्यात आली. पिंपरी-चिंचवड आर.टी.ओ. कार्यालयाकडे निवेदनही देण्यात आले यावेळी कांबळे बोलत होते. सोमनाथ कलाटे सुदाम बनसोडे, महादेव थोरात, बाळासाहेब डुंबरे, दिलीप साळवे, राजू कुदळे, अजिय भराटे, सुरेंद्र जाधव, दत्ता आवळे आदी उपस्थित होते.

या वेळी कांबळे म्हणाले, रिक्षा चालकांच्या प्रश्नावर आज महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालय समोर रिक्षा चालक आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने मंजूर केलेले नवीन वाहन मोटर विधेयक रद्द करावे, बजाज टी.व्ही.एस. पियजियो या कंपनी आणि त्यांचे रिक्षा विक्रेते (डीलर) यांच्या वतीने रिक्षा चालकांकडून आर.टी.ओ. टॅक्सच्या नावाखाली आणि बँक लोनच्या जास्त रकमेची लूट केली जात आहे, ती थांबवावी. पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदेशीर वाहतूक बंद झाली पाहिजे. रिक्षा चालक-मालकांसाठी सरकारने कल्याणकरी मंडळाची घोषणा केली त्याची अंमलबजावणी करावी.

ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांच्या वतीने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. यामुळे या सर्व कंपन्या बंद कराव्यात. रिक्षा इन्सुररेन्समध्ये भरमसाटी वाढ रद्द करावी. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.उपप्रादेशिक परिवहन कार्यलयाच्या वतीने चंद्रकांत जवळकर यांनी पिंपरी येथे येऊन रिक्षा चालकांचे निवेदन स्वीकारले आहे. न्याय मिळेपर्यंत लढा चालू राहील असे, कांबळे यांनी सांगितले.