Thu, Jun 27, 2019 00:03होमपेज › Pune › पोलिसांचा ‘दम’ काढणारा कुख्यात श्‍वेत्या जाळ्यात

पोलिसांचा ‘दम’ काढणारा कुख्यात श्‍वेत्या जाळ्यात

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पसार झाल्यानंतर पुणे पोलिसांचा ’दम’ काढणारा कुख्यात गुन्हेगार श्‍वेतांग ऊर्फ श्‍वेत्या निकाळजे (वय 26, रा. मंगळवार पेठ) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अखेर अटक केली. तब्बल दोन महिन्यांच्या अपहरण नाट्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.  धक्कादायक म्हणजे, श्‍वेतांग निकाळजेने पोलिसांना पकडून दाखविण्याचे आव्हान दिल्याची चर्चा खुद्द पोलिस दलातच सुरू होती. त्यामुळे त्याला पकडणे हे पोलिसांसाठी प्रतिष्ठेचे झाले होते. रविवारी त्याला अखेर भोरमधून अटक केली. दरम्यान, याप्रकरणात पोलिस आयुक्तांना उच्च न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. श्‍वेत्याच्या या कृत्यामुळे पुणे पोलिस दल गेल्या काही दिवसांपासून चर्चेेचा विषय ठरले होते.

श्‍वेतांग निकाळजे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दोन खुनाचे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी यासह बारा ते पंधरा गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचे लग्न झालेले आहे.

एप्रिल महिन्यात (दि. 7 एप्रिल) श्‍वेतांग याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांने संबंधित मुलीच्या भावाला संपर्क करून तुझ्या बहिणीशी लग्न करणार आहे. पोलिसांकडे तक्रार दिल्यास मी तुम्हाला संपवून टाकणार आहे, अशी धमकीही दिली होती. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, गुन्हा दाखल करताना पोलिस अधिकार्‍याने योग्यरित्या फिर्याद दाखल केली गेली नसल्याचा आरोप पालकांनी केला होता. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अपहरण प्रकरणाचा तपास देखील योग्यपद्धतीने होत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. याचिकेवर सुनावणी वेळी उच्च न्यायालयात तपासी अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेत पुणे पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करत थेट आयुक्त रश्मी शुक्ला यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर सहआयुक्त रविंद्र कदम हे उच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी हजर राहिले. त्यांनी उच्च न्यायालयात प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखेकडे देण्यात येईल. तत्कालीन तपासी अधिकार्‍याची पोलिस उपायुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, असे उच्च न्यायालयात सांगितले होते. याप्रकरणाचा तपास दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी श्‍वेतांग निकाळजेला आश्रय देणार्‍या चौघांना अटक केली. 

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाकडून त्याचा शोध सुरू होता. त्यावेळी कर्मचारी सचिन जाधव आणि गजानन सोनुने यांना श्‍वेतांग हा भोर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहाय्यक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, कर्मचारी सुधाकर माने, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, रिजवान जिनेडी, तुषार खडके व त्यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी श्‍वेतांग निकाळजेला भोर येथून सापळा रचून अटक केली. 

18 जुलैला होणार होता विवाह...

कुख्यात श्‍वेतांग निकाळजेने अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचे वय 17 वर्ष आहे. दरम्यान 17 जुलै 2018 रोजी तिला अठरा वर्षे पूर्ण होणार होती. त्यामुळे ते 18 जुलै रोजी लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापूर्वी श्‍वेतांग निकाळजेने पुणे पोलिसांनाच आव्हान दिल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. अपहरण नाट्यानंतर न्यायालयाकडून ताशेरे ओढल्यानंतर पुणे पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर याची गंभीर दखल घेत पोलिसांनी युद्ध पातळीवर त्याचा शोध सुरू केला. परंतु, दोन महिने श्‍वेतांग निकाळजेने पोलिसांचा दम काढला, असेही आता बोलले जात आहे. अपहरण केल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या खोल्या घेऊन राहिला.  पोलिसांनी त्याच्या तावडीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. दरम्यान उच्च न्यायालयात याप्रकरणी मंगळवारी (दि. 5) सुनावणी होणार आहे.