Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Pune › उपनगरांतही बंदला प्रतिसाद... 

उपनगरांतही बंदला प्रतिसाद... 

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 10:23PMमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला उपनगरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. उपनगरात पदयात्रा, रॅली, ठिय्या आंदोलन करण्यात आले. याला मराठा बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हॉटेल व्यावसायिक, भाजी विक्रेते इतर व्यावसायही बंद ठेवण्यात आलेे. तसेच कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोंढव्यात मुंडण करून निषेध 

मराठा समाज बांधवांनी क्रांती दिनादिवशी आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन सर्वांना केले होते. त्या हाकेला सर्व स्तरातून प्रतिसाद पाहायला मिळाला. कोंढवा, वानवडीमध्ये अत्यावश्क सेवा वगळता सर्वांनी कडकडीत बंद पाळून मराठी क्रांती मोर्चाला पाठिंबा दर्शविला. दिवसभरामध्ये कोणतीही अनुचित घटना या परिसरात घडली नाही.परिसरातील मराठा समाजाच्या युवकांनी मोटर सायकल रॅली काढून आपला निषेध नोंदविला. याशिवाय कोंढवा खुर्द परिसरातील युवकांनी ज्योती चौकात सार्वत्रिक मुंडण करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. वेळीच मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा पुढील हिंसक आंदोलनाला सामोरे जा, अशा घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. 

औंध, पाषाण, बाणेर-बालेवाडी परिसरात शुकशुकाट

येथील ग्रामस्थांनी सकाळी गावठाण परिसरात पदयात्रा काढून मराठा आरक्षणाचे समर्थन करीत कडक बंद पाळण्यात आला. तसेच गावठाण बाहेरच्या ठिकाणी दुचाकी रॉली काढून समर्थन करण्यात आले. 

पाषाण-सुतारवाडी- सोमेश्वरवाडीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. पदयात्रेची सुरुवात  पाषाण चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात झाली. सुतारवाडी, सूसरोड, बाणेर लिंक रोड मार्गे सोमेश्वरवाडीमध्ये शहीद काकासाहेब शिंदे व इतर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मोर्चाचे आयोजन माजी नगरसेवक प्रमोद निम्हण व स्वराज्य प्रतिष्ठान नी केले होते. या वेळी प्रमोद निम्हण, अमित खानेकर, समीर उत्तरकर , बालम सुतार संदीप निम्हण, मारुती निम्हण व नागरिक उपस्थित होते.

बाणेर-बालेवाडी येथील बंदला व्यापारी संघटनेने पाठिंबा दिल्यामुळे सर्वच दुकाने व व्यापार बंद होते. महामार्गावर रास्त रोको करूनही आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र बंदमुळे महामार्गावरही शुकशुकाट पहायला मिळाला.  

खडकी परिसरात बाजारपेठ बंद

मराठा आरक्षण आंदोलनासाठी मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र बंदचा पार्श्वभूमीवर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये बंद शांततेत पार पाडण्यात आला. बंदमुळे खडकी बाजार, रेंजहिल्स, साप्रस परिसरांमध्ये व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले होते. 

महाराष्ट्र बंदच्या हाकेवर खडकी परिसरात पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. परिसरातील सर्व पक्षीयांच्या वतीने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. मराठा समाजाच्या वतीने शिवाजी पुतळ्यापासून दुचाकी वाहनांवर रॅली काढण्यात आली होती. रॅली खडकी बाजार परिसरात फिरून एमएससीबी चौकांमध्ये शांततेत आंदोलन करण्यात आले. परिसरामधील मेडिकल दुकाने वगळता शाळा, महाविद्यालय, पेट्रोल पंप, चित्रपटगृह बंद ठेवण्यात आले होते. 

फुरसुंगी, भेकराईनगरमध्ये रॅली

मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आज मराठा संघटनांनी  पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला फुरसुंगी व परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केल्यामुळे या ठिकाणी 100% बंद यशस्वी झाल्याचे पाहावयास मिळाले. अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, दुकाने, कंपन्या, हॉटेल्स, पेट्रोल पम्प बंद होते. 

सकाळी दहाच्या सुमारास फुरसुंगीतील तरुणांनी फुरसुंगी गावासह भेकराईनगर व परिसरातून जोरदार रॅली काढून एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा दिल्या. त्यानंतर ही रॅली पुढे हडपसरच्या दिशेने रवाना झाली. बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज भेकराईनगर, मंतरवाडी, उरुळी फाटा, औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी, उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी या ठिकाणची दुकाने बंद असलेली पाहावयास मिळाली. त्यामुळे आज हडपसर-सासवड रस्ता तसेच मंतरवाडी-कात्रज बाह्यवळण मार्गावर किरकोळ वाहतूक वगळता शुकशुकाट जाणवला. भेकराईनगर, मंतरवाडी चौक, हांडेवाडी चौक या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

येरवडा, विश्रांतवाडी, लोहगावमध्ये शांतता

येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव व धानोरी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. नगर रस्त्यावरील हयात हॉटेलमध्ये नियोजित कार्यक्रम आंदोलन कर्त्यांनी बंद पाडला. त्यामुळे सायंकाळी उशिरा येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांनी दिली.लोहगावच्या मुख्य चौकात सकाळी अकरापासून सुमारे 2 तास जवळपास 2 हजार नागरिकांनी जमून ठिय्या आंदोलन केले. या चौकातून धानोरी, वडगाव-शिंदे, वाघोली व लोहगाव गावात जाणार्‍या चारही रस्त्यांवरील वाहतूक आंदोलनकर्त्यांनी गाड्या आडव्या लावून बंद केली होती. येरवड्यातही एअरपोर्ट रस्त्यावरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली काढण्यात आली. येरवड्यातील गाडीतळ, गुंजन चौक, गोल्फ चौक, रामनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूर चाळ, राज चौक, लक्ष्मीनगर, आदी सर्वच भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. विश्रांतवाडी, टिंगरेनगर, कळस व धानोरी परिसरातीलही सर्व व्यवहार आणि दुकाने बंद होती. धानोरी व विश्रांतवाडीतील नागरिकांनी रॅली काढली होती. या बंदच्या परिणामामुळे एरवी गजबजलेल्या चौकातील व रस्त्यांवरील वाहतूकही अत्यंत कमी झाल्याचे दिसत होते.