Wed, Jul 24, 2019 05:44होमपेज › Pune › पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये फेरबदल

पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये फेरबदल

Published On: Aug 07 2018 1:23AM | Last Updated: Aug 07 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील 13 पोलिस उपायुक्‍त, पोलिस अधीक्षकांची बदली करण्याचे आदेश गृहविभागाने सोमवारी काढले आहेत. 27 जुलै रोजी बदली करण्यात आलेल्या पुणे शहर पोलिस दलातील उपायुक्त डॉ़  बसवराज तेली, पंकज डहाणे, दीपक साकोरे यांची पुन्हा बदली करण्यात आली. तर प्रवीण मुंडे यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. उपायुक्त स्वप्ना गोरे यांची अप्पर अधीक्षक वाशिम या ठिकाणी बदली करण्यात आली होती़; त्यांची आता पुणे शहरात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ 

परिमंडळ 1 चे उपायुक्त डॉ़  बसवराज तेली यांची लोहमार्ग पुणे येथे पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती़  सोमवारी सकाळी त्यांनी या पदाचा कार्यभारही स्वीकारला; मात्र सायंकाळी त्यांची बदली वर्धा येथे पोलिस अधीक्षक म्हणून केल्याचा आदेश काढण्यात आला आहे़  परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे उपायुक्तपदी बदली करण्यात आली होती; आता त्यांची बदली  राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) पुणे येथे अधीक्षकपदी झाली आहे़  

गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे यांची गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई येथे बदली करण्यात आली होती. आता नव्याने त्यांची नवी मुंबईत उपायुक्तपदी बदली झाली आहे़ परिमंडळ 2 चे उपायुक्त डॉ़  प्रवीण मुंडे यांची धुळे येथे पोलिस अधीक्षकपदी बदली झाली होती़  त्यांच्या जागी विश्वास पांढरे यांची धुळे येथे बदली करण्यात आली असून, डॉ़  मुंडे यांच्या नव्या पदाचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे़