Fri, Aug 23, 2019 21:08होमपेज › Pune › बंदचा एसटी सेवेला फटका

बंदचा एसटी सेवेला फटका

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 10:51PMपिंपरी : प्रतिनिधी 

विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. राज्यासह विविध भागात केलेल्या आंदोलनाचा फटका शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसला असून वल्लभनगर आगारातही शुकशुकाट दिसून आला. प्रवासीच नसल्याने वल्लभनगर आगारातून बस सोडण्यात आल्या नसल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.  महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर वल्लभनगर एसटी आगारातून जाणार्‍या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच, प्रवासीच नसल्यामुळे गाड्या सोडण्यात आल्या नसून संपाचा विशेष फटका बसला नसल्याचे आगार व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

बुधवारी वल्लभनगर आगारात प्रवासीच नसल्याने आगारात शिवशाहीसह एसटी बस उभ्या होत्या, तर आगारात प्रवाशांअभावी शुकशुकाट दिसून आला. वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने प्रवाशांचे काही प्रमाणात हाल झाल्याचे दिसून आले. मुंबईहून पुण्यात येणार्‍या बसेस सुमारे दीड-दोन तास उशिराने शहरात दाखल झाल्या असून पुणे-मुंबई बस सोडण्यात आल्या नसल्याचे चित्र असून फेर्‍या रद्द करण्यात आल्या नाही, असा दावा एसटीने केला आहे.

महाराष्ट्र बंद असल्यामुळे एस.टी. बसेस अतिरिक्त व उशिरा सुटतील, असा फलक यावेळी वल्लभनगर आगारात लावण्यात आला होता. तसेच, प्रवासीच नसल्यामुळे बंदचा फारसा परिणाम झाला नसल्याचे आगार व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात मात्र आगारात शुकशुकाट दिसून आला.