Mon, Aug 19, 2019 05:32होमपेज › Pune › शॉर्टकट ठरतोय जीवघेणा...

शॉर्टकट ठरतोय जीवघेणा...

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 11:08PMपुणे : प्रतिनिधी 

काही मिनिटे वाचविण्याच्या नादात शॉर्टकट घेत धोकादायकपणे लोहमार्ग ओलांडणार्‍यांचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे धक्कादायक चित्र सध्या दिसत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने सर्वच स्थानकांवर पादचारी पूल उभारल्याचा दावा केला आहे. मात्र जिने चढत पादचारी पूल ओलांडण्यापेक्षा जीव धोक्यात घालून थेट लोहमार्ग ओलांडण्यातच प्रवासी धन्यता मानत असून रेल्वेने धडक दिल्याने मृत्युमुखी पडणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, खडकी, आकुर्डी, देहूरोड येथे लोहमार्ग ओलांडणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. 

गेल्या पाच वर्षात लोहमार्ग ओलांडताना पुणे विभागात तब्बल 2 हजार 383 मृत्यू झाले असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. शॉर्टकट घेत केवळ काही सेंकद वाचविण्याच्या नादात प्रवासी आपला जीव पणाला लावत असून त्यांचा हकनाक बळी जात आहे. रेल्वेचा अंदाज व हॉर्न ऐकू न आल्याने धडक बसून अनेकांचा मृत्यू ओढवतो. 2013 मध्ये लोहमार्ग ओलांडताना 515 मृत्यू, 2014 मध्ये 461 मृत्यू, 2015 मध्ये 462 मृत्यू, 2016 मध्ये 405 मृत्यू, 2017 मध्ये तब्बल 540 मृत्यू झाल्याची आकडेवारी रेल्वेच्या वतीने देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे 2013 नंतर 2014, 2015, 2016 मध्ये लोहमार्ग ओलांडताना मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत नोंदविण्यात आलेली घट 2017 मध्ये पुन्हा एकदा वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले. 

दरम्यान, गेल्या पाच वर्षात सुमारे तीस हजार प्रवाशांवर अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. परंतु, दंड देऊन आपली सुटका झाली, अशा आविर्भावात प्रवासी तीच चूक पुन्हा पुन्हा करत असून अनेकांना जीवास मुकावे लागत आहे. रेल्वेच्या वतीने प्रवाशांमध्ये वेळोवेळी जनजागृती करण्यात येते. रेल्वे स्थानक परिसर, शाळा, महाविद्यालय, रेल्वेमध्ये, लोहमार्गाशेजारील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन, पत्रके, पॅम्पलेट, ब्रोशर्स वाटून लोहमार्ग ओलांडण्यामागचे धोके समजावून सांगितले जातात. मात्र तरीदेखील लोहमार्ग ओलांडण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नसून रेल्वेसाठी ही गोष्ट डोकेदुखीच ठरत आहे.