Wed, Jun 26, 2019 11:40होमपेज › Pune › ‘शॉर्टकट’ बेततोय जिवावर

‘शॉर्टकट’ बेततोय जिवावर

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 12:32AMपिंपरी : प्रतिनिधी

कार्यालय वेळेत गाठण्याच्या गडबडीत अवलंबण्यात येणारा रेल्वे रुळांचा ‘शॉर्टकट’ प्रवाशांकरिता ‘मृत्युमार्ग’ ठरत आहे. अनेक रेल्वे प्रवासी पादचारी पुलाचा वापर न करता धोकादायकरित्या रेल्वे रूळ ओलांडताना पाहायला मिळतात. त्यामुळे शहरात रेल्वे अपघातांचेे प्रमाण वाढत आहे. या संपूर्ण प्रकाराला रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. आज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करत आहेत. या प्रवाशांमुळेच रेल्वेला भरघोस महसूल मिळत असून प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार चिंचवड प्रवासी संघाने केली आहे. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्णतः खबरदारी घेतली जात असून अनेकदा अनाउन्समेंट करुनही प्रवाशांच्या वागणुकीत बदल होत नाही. ते पादचारी पुलाचा वापरच करत नाहीत, असा दावा रेल्वे प्रशासन करत आहे. वेळेत कामावर जाण्याच्या घाईत अनेक प्रवासी धोकादायक पध्दतीने रेल्वे रुळ ओलांडताना या निष्काळजीपणाचा बळी ठरले आहेत. 

देहूरोड, आकुर्डी, पिंपरी, कासारवाडी, दापोडी तसेच खडकीत यामुळे अनेक अपघात घडले आहेत. हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणे, रेल्वेच्या दारात उभा राहून किंवा बसून प्रवास करणे, रेल्वेत प्रवेश करताना व उतरताना होणारी गर्दी, धोकादायक पद्धतीने प्रवासी एका रेल्वेतून दुसर्‍या रेल्वेत जातात. जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळ ओलांडून जीवघेणा शॉर्टकट वापरताना प्रवाशांना कोणीही आडवताना दिसत नाही. याकामी आरपीएफची उदासीनता कारणीभूत असून नियम मोडणार्‍या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केल्यास रेल्वे अपघातात बळी जाणार्‍यांची संख्या निश्‍चितच कमी होईल अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.

Tags : Pimpri, Shortcut, dangerous,  life