Fri, Apr 26, 2019 17:49होमपेज › Pune › पुण्यात आता दोन शिवसृष्टी! 

पुण्यात आता दोन शिवसृष्टी! 

Published On: Feb 10 2018 1:53AM | Last Updated: Feb 10 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचे स्टेशन आणि चांदणी चौकाजवळील जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी)  आरक्षित 50 एकर जागेवर शिवसृष्टी साकारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मंगळवारी मुंबईतील बैठकीत तोंडी मान्यता देण्यात आली, तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कात्रज-मुंबई महामार्गावरील शिवशाहीर बाबासाहेब पुरदरे यांच्या शिवसृष्टीला मंजुरी देत 300 कोटी रुपयांचे आर्थिक साह्य मंजूर करत सांस्कृतिक आणि पर्यटन दर्जा जाहीर केला आहे. पुरंदरे यांच्या शिवसृष्टीच्या मान्यतेचा अध्यादेश गुरुवारी शासनाने जाहीर केला. त्यामुळे आत्ता दोन शिवसृष्टी साकारणार आहेत. या दुसर्‍या शिवसृष्टीस मिळालेल्या मान्यतेमुळे कोथरूड येथील शिवसृष्टीसंबंधीचा संभ्रम वाढला आहे. 

कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी की मेट्रोचा डेपो, हा तिढा सोडविताना मुख्यमंत्र्यांनी याच आठवड्याच्या सुरुवातीस चांदणी चौकामध्ये 50 एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात येत्या 15 दिवसांमध्ये भूसंपादन आणि मोबदल्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या निर्णयाचा शहर भाजपने आनंदोत्सवही साजरा केला. त्यामुळे कोथरूड येथे भव्य शिवसष्टी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला होता; मात्र या आनंदोत्सवाचा गुलालाचा धुरळा खाली उतरण्याआधीच राज्य सरकारने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला मेगा प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुण्यात एकाच रस्त्यावर दोन शिवसृष्टी साकारणार की, चांदणी चौकातील शिवसृष्टी कागदावरच राहणार, असा संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सरकारने या दुसर्‍या शिवसृष्टीची अधिसूचना गुरुवारी काढली आहे. त्यानुसार पर्यटन विकास धोरण 2016 च्या अंतर्गत महाराष्ट्र शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने आंबेगाव, ता. हवेली याठिकाणी ‘थीम पार्क शिवसृष्टी’ उभारण्यास परवानगी दिली. 

या प्रकल्पासाठी अंदाजे 300 कोटी  भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विकास धोरणांतर्गत  या प्रकल्पाला मान्यता दिली असल्यामुळे त्यास अनेक फायदे मिळणार आहेत. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांची शिवसृष्टी कात्रज पासून तीन ते चार किलोमिटरच्या अंतरावर आंबेगाव याठिकाणी असणार आहे. तर महापालिका साकारत असलेली शिवसृष्टी याच रस्त्यावर चांदणी चौकामध्ये साकारण्यात येईल.