Sat, Mar 23, 2019 12:00होमपेज › Pune › शिवशाहीचे जाळे आणखी विस्तारणार

शिवशाहीचे जाळे आणखी विस्तारणार

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:19AMपुणे : प्रतिनिधी 

अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या वातानुकूलित शिवशाही बसचे जाळे आणखी विस्तारणार असल्याची माहिती एसटी सूत्रांनी दिली आहे.  शिवनेरी किल्ल्याला पोहोचण्यासाठी प्रवाशांना सोपे जावे यासाठी जुन्नरपर्यंत शिवशाही सेवा पहिल्यांदाच सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती देण्यात आली. पुणे विभागाकडून एकूण तीन प्रस्ताव पाठविण्यात आले असून, पंढरपूर-जुन्नर, कुर्ला-जुन्नर, पनवेल-जुन्नर यापैकी एका मार्गाची निवड होणार आहे. 

दरम्यान, शिवशाही बस आरामदायी श्रेणीत मोडत असल्याने जवळच्या अंतरासाठी ती सुरू करता येणे शक्य नाही. लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा विचार करून वातानुकूलित सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे पुण्याहून जुन्नरसाठी शिवशाही बस सुरू करता येणार नाही, असेही या वेळी सांगण्यात आले. पुण्याच्या पिंपरी-चिंचवड आगारातून हैदराबाद व स्वारगेट येथून बारामतीकरिता शिवशाही सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सध्या बारामती व हैदराबादसाठी साधी बस व हिरकणी (सेमी लक्झरी) उपलब्ध आहे.

नव्या मार्गांची चाचपणी सुरू

शिवशाहीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, माफक दरात प्रवाशांना आरामदायी सेवा मिळत आहे. पुण्याहून हैदराबाद, बारामतीकरिता शिवशाहीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, तो मंजूर झाल्यास या मार्गावरही वातानुकूलित शिवशाही धावू लागेल. नव्या मार्गांची चाचपणी सुरू असून, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता अन्यही मार्गांवर शिवशाही सुरू करण्याचा विचार आहे.  -श्रीनिवास जोशी, विभागनियंत्रक