Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Pune › ‘शिवशाही’त मोफत वायफाय

‘शिवशाही’त मोफत वायफाय

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 27 2017 11:56PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही या नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित बसमध्ये इंटरनेट वायफाय बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सर्व शिवशाहींमध्ये एप्रिलपर्यंत टप्प्याटप्प्याने वायफाय बसविण्यात येणार आहे. मोफत इंटरनेट सेवा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांना सोशल मीडियाचा वापर करता येणार आहे. 

इंटरनेट ही मूलभूत गरज बनली असून, ही गरज ओळखूनच शिवशाहीमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे एसटी प्रशासनाने सांगितले. पुढील दोन महिन्यांमध्ये 200 शिवशाहींमध्ये वायफाय बसविण्यात येणार असून, एप्रिल अखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार्‍या तब्बल दोन हजार शिवशाहींमध्ये वायफाय बसविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. 

ज्या कंपनीकडून शिवशाहीच्या बस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत, त्या कंपनीकडूनच वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वायफायच्या देखभाल-दुरुस्तीची सर्व जबाबदारी त्या कंपनीवरच राहील, असेही सांगण्यात आले. शिवशाहीमधील चालकाच्या पाठीमागे एक कंपार्टमेन्ट  तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये राउटर, दोन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

प्रवाशांच्या सीटच्या पुढील बाजूस वायफाय कसा वापरावा, याची माहिती दिली जाणार असून, त्यावर वायफायचा पासवर्ड लिहिण्यात येईल. तो पासवर्ड प्रवाशाने आपल्या मोबाईलवर टाकल्यानंतर त्याला मोफत इंटरनेटचा लाभ घेता येईल.