Thu, Apr 25, 2019 16:00होमपेज › Pune › शिवशाही बसचा दरवाजा उघडल्याने चालक रस्त्यावर

शिवशाही बसचा दरवाजा उघडल्याने चालक रस्त्यावर

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 2:15AMमंचर : प्रतिनिधी

शिवशाही एसटी बसचा चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडून चालक एसटी गाडी बाहेर फेकला गेल्याने एसटी विना चालकाची सुमारे 800 फूट शेतातून धावत जाऊन एका बाभळीच्या झाडाला अडकली. यात एसटीतील सुमारे 27 प्रवासी बालंबाल बचावले, तर एक प्रवासी आणि बसचा चालक जखमी झाला. हा अपघात पुणे-नाशिक रस्त्यावरील मंचरजवळील भोरवाडी येथे शनिवारी (दि. 7) पहाटे अडीच वाजता घडला.

नाशिक क्रमांक 1 एसटी आगाराची नाशिक-पुणे शिवशाही एसटी (एमएच 06, बीडब्ल्यू 0647) घेऊन एसटीचे चालक मोहन सोनाजी भिसे (वय 39, रा. नाशिक) पुण्याच्या दिशेने जात होते. भोरवाडी-मंचरजवळ अरुंद पूल ओलांडून दोन लेनचा रस्ता सुरू झाला. त्यावेळी शिवशाही बस रस्त्याच्या कडेला असणार्‍या दुभाजकाला आदळल्याने चालकाशेजारील असणारा दरवाजा अचानक उघडून चालक मोहन सोनाजी भिसे हे एसटी बाहेर फेकले गेले.

एसटीच्या जोराच्या आवाजाने आसन क्रमांक 6 वर चालकाच्या बाजूने बसलेले प्रवासी नीलेश दत्तात्रय वाघ (वय 38, रा. नाशिक) यांना जाग आली. त्यावेळी आवाज कशाचा झाला हे पाहण्यासाठी बसच्या चालका जवळ येऊन पाहतात तर चालक त्याच्या जागेवर नव्हता. तसेच एसटी गाडी रस्ता सोडून जात असल्याचे पाहून प्रवासी नीलेश वाघ यांनी चालकाच्या केबीनमधून उघड्या दरवाजातून अंधारतच उडी मारली. त्यानंतर अवघ्या 50 ते 60 फुटांवर विनाचालक शिवशाही बस बाभळीच्या झाडावर जाऊन आदळली. बसमधील घाबरलेल्या प्रवाशांनी मोबाईलद्वारे मंचर पोलिस ठाणे, एसटी अधिकारी आणि मित्रांना अपघात झाल्याची माहिती दिली. 

त्यावेळी मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस, ठाणे अंमलदार मारुती मांजरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी प्रवाशांना बसबाहेर काढले. तर जखमी एसटी चालक मोहन भिसे आणि प्रवाशी नीलेश वाघ यांना वैद्यकीय उपचारासाठी मंचर येथील सिद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल केेले. त्यावेळी डॉ. अतुल शिंदे यांनी वैद्यकीय तपासणी केली असता चालक मोहन भिसे यांना किरकोळ खरचटल्याचे आढळून आले. तर प्रवासी नीलेश वाघ यांचा डावा पाय मांडीत फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले. मंचर पोलिस आणि एसटी अधिकार्‍यांनी घटनास्थळी अपघाताचा पंचनामा केला आहे.