Mon, Jul 15, 2019 23:44होमपेज › Pune › शिवसेनेची नजर आयात उमेदवारांवर

शिवसेनेची नजर आयात उमेदवारांवर

Published On: Jul 16 2018 1:22AM | Last Updated: Jul 16 2018 1:18AMपुणे : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघात शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नाहीत, अशा ठिकाणी शिवसेनेची नजर आयात उमेदवारांवरच राहणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत पदाधिकार्‍यांच्या बैठकीत शनिवारी  दिले. 

आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांच्या ठाकरे यांनी पुण्यात बैठका घेतल्या. याबैठकित विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसंबंधी आढावा घेतला व पदाधिकार्‍यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले. यात पुणे लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत शहरातील एका पदाधिकार्‍याने विधानसभा निवडणुकीसाठी आयात उमेदवारांना संधी न देता पक्षातील कार्यकर्त्यांनाच उमेदवारी  द्यावी, अशी मागणी केली. त्यावर ठाकरे यांनी या पदाधिकार्‍याला थेट गत विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला.  

ते म्हणाले, त्यावेळेस अन्य पक्षातील तब्बल 50 ते 55 जण शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीबाहेर उभे होते. मात्र, मी पक्षाला साथ देणार्‍या कार्यकर्त्यांनाच प्राधान्य द्यायचा निर्णय घेऊन पक्षातील लोकांना उमेदवारी दिल्या होत्या. मात्र, अन्य पक्षातील जे लोक माझ्याकडे उमेदवारीसाठी आले होते आणि त्यांना मी उमेदवारी दिली नाही, अशातील जवळपास 35 ते 40 जण भाजपकडे जाऊन आमदार झाले, त्यामध्ये त्यांनी पिंपरी चिंचवडमधील एका आमदाराच्या नावाचे उदाहरणही या बैठकीत दिले. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची हे मी ठरवेल या शब्दात त्यांनी यावेळेस अन्य पक्षातील आयात उमेदवारांना संधी देण्याचे संकेत दिले.

पुण्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यामधील जवळपास तीन ते चार ठिकाणी शिवसेनेकडे ताकदवान उमेदवार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या मतदारसंघात आयात उमेदवारांवर सेनेचा डोळा असणार आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच सेनेच्या शहरातील एका  पदाधिकार्‍याने गत विधानसभा निवडणूक लढविलेल्या आणि आता पक्षात नसलेल्या काही जणांशी संपर्क साधला होता व पुन्हा पक्षात येण्याचे निमंत्रणही दिले होते. लोकसभेसाठी सेना याच पर्यायाच्या विचारात असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी काही नावांबद्दल प्राथमिक चर्चाही झाली. त्यामुळे किमान विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप या पक्षातील इच्छुकांना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास सेनेच्या उमेदवारीचा पर्याय आयत्यावेळी मिळू शकतो.