Wed, Jun 26, 2019 18:31होमपेज › Pune › युती करण्याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा

युती करण्याचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा

Published On: May 18 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 1:26AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन भाजपा आणि शिवसेनेचा विचार एक आहे. युती तोडणार्‍यामध्ये आमच्या पक्षाचे नाहीत. युती जोडणार्‍यामध्ये आमच्या पक्षाचे नाव आहे. युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा असून, त्याची जबाबदारी आता आमची नसल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.वृक्ष लागवडीच्या पुणे विभागाच्या आढावा बैठकीसंदर्भात ते गुरूवारी (दि.17) पुण्यामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते  म्हणाले, ’साथ मे आयेंगे तो, साथ मे लढेंगे, नही आयेंगे तो अकेले महाराष्ट्र में फिरसे जित के आयेंगे’. दुर्देवाने पंधरा वर्षे महाराष्ट्राला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मगरमिठीतून काढण्यासाठी लागले. ज्या महाराष्ट्रात जनतेचा सुड घेण्याचा एक कलमी कार्यक्रम पंधरा वर्षे होता, अशा पक्षाच्या हाती राज्य पुन्हा जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. या अपेक्षेपोटी नेहमी शिवसेनेशी युती करण्याची भूमिका मी मांडतो.

एकनाथ खडसे यांनी अग्निपरीक्षा दिली

एकनाथ खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय हायकमांड घेतील. त्यांनी चांगले काम केले म्हणून चांगले झाले. त्यांच्यावर आरोप झाले, त्यावर सरकारने चौकशी लावली. नियमाच्या चौकटीत न्यायालयात एसीबीने अहवाल दिला. एकनाथ खडसे चाळीस वर्षापासून भाजपासाठी काम करतात. त्यांनी अग्निपरीक्षा दिली. पुढे न्यायालय निर्णय घेईल. अहवालामध्ये विसंगती असल्याच्या प्रश्‍नावर मुनगंटीवर म्हणाले, आपल्या व्यवस्थेमध्ये कुणाला असे वाटत असेल, तर त्यांना न्यायालया समोर पुरावे मांडता येतात.

सर्वोच्च न्यायालयात दुध का दुध और पाणी का पाणी

कर्नाटकबद्दल राज्यपालांनी घेतलेला निर्णय हा घटनेच्या चौकटीत आहे. आता काँग्रेस आणि जेडीएस यांना भीती का वाटत आहे. त्यांच्या सदस्यांनी सद्सद्विवेकबुद्धीने राज्याच्या हिताच्या निर्णयाचा विचार करू नये अशी त्यांची  अपेक्षा आहे का? आता भाजपाला प्रथम सत्ता स्थापण्यास सांगितले आहे. तेथे बहुमत सिद्ध करावेच लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहे तर तिथे ‘दुध का दुध और पाणी का पाणी’ होणारच आहे.