Sun, Mar 24, 2019 22:55
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर?

शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर?

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 12:44AM

बुकमार्क करा

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

शिवसेनेत संघटनात्मक बदल होणार असून, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची नियुक्ती निश्‍चित असल्याचे समजते. लवकरच त्यांच्या नावाच्या नियुक्तीची घोषणा अपेक्षित आहे.

पिंपरी-चिंचवड  महापालिका निवडणुकीत  युतीच्या आशेवर असलेल्या  शिवसेनेला युती तुटल्याने स्वतंत्ररीत्या निवडणुकीस सामोरे जावे लागले. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलेले लक्ष, राष्ट्रवादीतील दिग्गजांचा भाजपतील प्रवेश, शिवसेनेतील गटातटाचे राजकारण, काहीसे चुकीचे तिकीटवाटप यामुळे शिवसेनेचा दारुण पराभव झाला. 128 पैकी 77 जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता संपादन केली, तर शिवसेनेला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला. यातून सावरण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. 

स्थानिक राजकारण; तसेच शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी आपल्याला शहर प्रमुखपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची केलेली विनंती, राज्यात सेनेचे भाजपशी ताणलेले संबंध पाहता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीला स्वतंत्ररीत्या सामोरे जावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन, शिवसेनेची तयारी सुरू आहे. 

पक्षाचे नेते, खा. संजय राऊत यांच्याकडे पिंपरी-चिंचवडच्या संपर्कनेतेपदाची जबाबदारी दिली गेली  तेव्हाच ‘पुढारी’ने  सेनेत संघटनात्मक बदल होणार असल्याचे वृत्त दिले होते. नवीन संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख व शहर प्रमुख यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा मातोश्रीवर बैठक घेऊन याबाबत मते जाणून घेतली होती. 

सप्टेंबरमध्ये मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत  शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शहरप्रमुखपदासाठी सुलभा उबाळे यांच्या नावाची शिफारस केली. चिंचवडला बारणे यांच्या रूपाने खासदार, पिंपरीत चाबुकस्वार यांच्या रूपाने आमदार अशी ताकद आहे. भोसरीत शहरप्रमुखपद दिले, तर समतोल साधला जाईल त्यासाठी पक्षातील आक्रमक चेहरा असलेल्या सुलभा उबाळे यांना शहरप्रमुखपदी संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली; मात्र मावळचे खा. श्रीरंग बारणे व पिंपरीचे आ. गौतम चाबुकस्वार यांनी शहरप्रमुखपदासाठी पिंपरी मतदारसंघाचे माजी प्रमुख योगेश बाबर यांच्या नावाचा आग्रह धरला. यातील बाबर यांच्या नावाला उद्धव ठाकरे यांची पसंती आहे. 

पुणे शहरासाठी दोन शहरप्रमुख नियुक्त केल्याने पिंपरी-चिंचवडमध्येही प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक याप्रमाणे तीन शहरप्रमुख नेमले जाणार का का, याबाबत उत्सुकता होती; मात्र योगेश बाबर यांच्या रूपाने एकच शहरप्रमुख नियुक्त केला जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. 

योगेश  बाबर हे शिवसेनेचे माजी खा. गजानन बाबर यांचे पुतणे आहेत. लोकसभेला मावळातून तिकीट नाकारले गेले तेव्हा गजानन बाबर यांनी शिवबंधन तोडले व मनसेत जाऊन शेकापच्या लक्ष्मण जगताप यांची पाठराखण केली; मात्र योगेश बाबर शिवसेनेतच राहिले. पालिका निवडणुकीत त्यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने बाबर यांनी मोरवाडी-शाहूनगरमधून बंडखोरी केली व लक्षणीय मतेही मिळवली होती. दरम्यान, ते भाजपच्याही संपर्कात होते; मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून  वजनदार पदाचा शब्द न मिळाल्याने आणि खासदार बारणे यांनी शहरप्रमुखपदासाठी शब्द दिल्याने ते सेनेतच राहिले. त्यांची शहरप्रमुखपदी नियुक्ती झाल्यास सेनेतच राहण्याचा त्यांचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होणार आहे.